व्यवस्थेचे लोटांगण!

घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत कलम १४ अन्वये कायद्यापुढे समानता हे संवैधानिक तत्व अंतर्भूत केले, कायद्यापुढे सर्वांना समान वागवले जाईल अशी सर्वांना आश्वस्त करणारी लोकशाही तरतूद केली.परंतु खरच ईथली व्यवस्था याचे काटेकोरपणे पालन करते का याचे उत्तर नाही असेच म्हणावे लागेल कारण काल परवा पुण्यात एका धनदांडग्या बापाच्या मुजोर तथाकथित अल्पवयीन बाळाने भरधाव वेगाने गाडी चालवून एका तरुण तरुणीचा बळी घेतला तिथ उपस्थित जनता जनार्दनांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले खरे पण पोलिस यंत्रणेने त्यावर कडक कारवाई करण्याऐवजी त्या मुलाला चक्क पोलिस चौकीत बसवून पिझ्झा, बर्गर वगैरे ची खैरात दिली अशी चर्चा सुरू झाली व त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याला वाचविण्यासाठी दुसरी कलम लावली.

त्यानंतर न्यायालयात त्याला हजर केल्यावर तर कहरच झाला चक्क न्यायाधीश महोदयांनी त्याला कठोर शासन न करता वाहतूकीच्या नियमांवर निबंध लिहून वाहतूक पोलिसांबरोबर नियमांचे धडे गिरवायला सांगून त्याची रवानगी बाल सुधारगृहात न करता जामिनावर सुटका करण्यात आली, नंतर सर्वसामान्य जनता, सोशल मीडिया, विरोधी पक्ष यांचा यावर आक्रोश पाहता त्याचा जामीन रद्द करण्यात आला.पण तरीही व्यवस्थेच्या या दलालीत अजून दोन दलाल पुढ लोटांगण घालण्यासाठी तत्परच होते, पुणे येथील ससून हॉस्पिटल जे सर्वसामान्य जनतेसाठी रुग्णांसाठी उपचार घेण्याकरिता विश्वासाचे व महत्वाचे आहे अशा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्या धनदांडग्या मुलाच्या बापाच्या पैशापुढे लोटांगण घालून चक्क त्या मुलाच्या ब्लड सॅंपलमधे फेरफार करून त्याचे सॅंपल कचऱ्यात फेकून दिले व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून दलाली केली.
सर्वसामान्य जर कुणी असता तर त्याच्यापुढे व्यवस्थेने असं लोटांगण घातलं असत का ? त्याला लगेच पोलिसी खाक्या दाखवून तुरुंगात सडवत ठेवला असता एका धनदांडग्या बापाच्या मस्तमोल मग्रुर मुलाला वाचवण्यासाठी इथली व्यवस्था किती तत्पर असते हे अधोरेखित झालं आहे.

पैशाच्या जीवावर न्याय विकत घेता येतो हे पुन्हा एकदा या घटनेने सर्वसामान्य माणसाच्या मनावर बिंबवले आहे म्हणूनच लोकशाहिर अण्णाभाऊ साठे ह्यांनी म्हटलंच आहे की, “ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली,ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे? कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली.”

✍️ समाधान दणाने, करमाळा जिल्हा-सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!