गाव पाण्याखाली, वीज गायब… गावकऱ्यांचा ट्रेन पकडून नातेवाईकांकडे धावा

आज सोलापूर-पुणे डेमोने प्रवास करताना मला एक हृदय पिळवटून टाकणारा अनुभव डोळ्यांसमोर आला. केमकडे येताना गाडी वाकाव स्टेशनवर थांबली आणि क्षणात दोन्ही बाजूंनी भरगच्च गर्दी गाडीत शिरली. गर्दी एवढी का, हा प्रश्न मनात आला. जरा विचारपूस केली, तर जे उत्तर मिळालं ते हृदय हेलावून टाकणारं होतं.

गेल्या सात दिवसांपासून गावात वीज नाही. चार दिवसांपासून संपूर्ण गाव पाण्याखाली आहे. घरात शिरायचं, बाहेर यायचं तर पोहतच जावं लागतंय. जनावरे दगावलीत, काही पाण्यात वाहून गेलीत. चार दिवसांपासून स्वयंपाक नाही, जेवण नाही, अंगाला आंघोळ नाही, कपडे बदलायला नाहीत. जे काही अंगावर आहे, तेच घेऊन ते गाव सोडून निघालेत.
चार दिवस सतत पाण्यात राहिल्यामुळे अनेकांच्या हातापायाच्या बोटांना जखमा झाल्यात. स्त्रिया, पुरुष, लहान मुले, वृद्ध – सगळ्यांचेच चेहरे फक्त जगण्याच्या तळमळीने व्यापलेले होते. गाडीत एकमेकांना शोधत होते – “हा आलाय का? तो कुठे आहे?” कोण आलेत, कोण गावात अडकले आहेत, याची काळजीने विचारपूस सुरू होती.

त्यातल्या अनेकांच्या चेहऱ्यावरून उपासमारीची छाया स्पष्ट दिसत होती. घरात पाणी असल्याने स्वयंपाक कसा होणार? खाणं कुठून मिळणार? डेमो दुपारी एक वाजता असली, तरी ते सकाळी दहाच्याच सुमारास स्टेशनवर पोचले होते. कारण पुन्हा पाऊस आला, तर परत पुराचा धोका ओढवेल, या भीतीने ते आधीच निघाले.
मोबाइलला नेटवर्क नाही, चार्जिंग नाही. एकाने स्टेशन मास्टरला विनंती करून माढ्यातील नातेवाइकाला फोन केला होता – “आम्ही पुण्याकडे निघालो आहोत. चार दिवस उपाशी आहोत.”

गाडी माढ्यात थांबली, तेव्हा एक नातेवाईक हातात भाकरी-चटणी घेऊन आला. गाडीत चढून त्याने ती भाकरी वाटायला सुरुवात केली. चार दिवस उपाशी राहिलेल्या त्या लोकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. रेल्वेच्या चाकापेक्षाही ती भाकरी त्यांना मोठी भासत होती. “जगलो आपण,” या भावनेने सुस्कारा टाकत ते खात होते.
हे सर्व पाहताना गाडी केमला आली, पण मन मात्र वाकावच्या त्या पुरग्रस्त लोकांमध्येच रेंगाळून राहिलं. ही फक्त त्यांची नव्हे, तर पुरात अडकलेल्या असंख्य लोकांची वेदना आहे.
आज म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे – आपली काळजी घ्यायचीच, पण जे बाधित झाले आहेत त्यांच्यासाठीही आपण सहकार्य करायचं, हात पुढे करायचाच.
✍️ महेश ओहोळ, केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर


