मंडल अधिकाऱ्याच्या जबाबाची फाडाफाड; पोलीसावर गुन्हा दाखल

करमाळा (दि. २२) : केम (ता. करमाळा) येथे महसुली कामकाजादरम्यान एका मंडल अधिकाऱ्याच्या हातातील अधिकृत दस्तऐवज हिसकावून फाडल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत संबंधित व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर व्यक्ती पुणे जिल्ह्यात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

मंडल अधिकारी मिरा गोरोबा नागटिळक (वय ४१, रा. कुर्डवाडी, ता. माढा) यांनी यासंदर्भात तहसील कार्यालयात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केम मंडलांतर्गत गट क्र. ५६७ संदर्भातील वादित जागेच्या स्थळ पाहणीसाठी त्या १८ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष स्थळी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी वादी आणि प्रतिवादी दोघांचे जबाब पंचासमक्ष नोंदवून घेतले होते. त्या जबाबांवर संबंधितांनी स्वखुशीने सही व अंगठा केला होता.

दरम्यान, प्रतिवादी बाळू लिंबाजी देवकर यांचा मुलगा विकास बाळू देवकर हे पोलीस गणवेशात त्या ठिकाणी आले. त्यांनी अधिकाऱ्यांनी नोंदवलेला जबाब वाचून घेतला आणि त्यात त्रुटी असल्याचा दावा केला. मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतरही विकास देवकर यांनी जबरदस्तीने अधिकाऱ्यांच्या हातातील जबाब हिसकावून तो फाडून टाकला आणि नवीन जबाब घेण्यास दबाव टाकला. यावेळी देवकर यांनी शिवीगाळही केल्याची नोंद आहे.

यानंतर त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात नवीन जबाब लिहून त्यावर वडिलांची सही घेतली आणि तो दस्तऐवज अधिकाऱ्यांकडे दिला. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांच्या सरकारी कामात उघड अडथळा निर्माण झाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार विकास बाळू देवकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सदर घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून शासकीय कामकाज करताना सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ हे करत आहेत.




