भरधाव वेगात ट्रकने धडक दिल्याने ट्रॅक्टचालकाचा उपचार दरम्यान मृत्यू..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : भरधाव वेगात ट्रकचालकाने आपल्या ताब्यातील ट्रक चालवून एका ट्रॅक्टरचालकाला जोराची धडक दिली असून या ट्रॅक्टरचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास विहाळ (ता. करमाळा) येथील भैरवनाथ कारखान्यासमोर झाला आहे.
या प्रकरणी लखन दिलीप नागटिळक यांनी फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले, की मी ट्रॅक्टर भरून भैरवनाथ साखर कारखान्याच्या गेट समोरील वाहनांच्या रांगेत उभा होतो. त्यावेळी माझ्यापुढे शेटफळ येथील पांडूरंग शिवाजी पोळ यांचा ट्रॅक्टर उभा होता व त्यावरील ट्रॅक्टरचालक हिरामन मोहन भोई (वय ३५, रा. पिंपरी, ता. इंदापूर, जि. पुणे सध्या रा. आलेश्वर, ता. परांडा, जि. उस्मानाबाद ) हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर उभा करून रस्त्याच्या कडेला उभा होता.
कोर्टीहून एक भरधाव वेगाने ट्रक चालक त्याच्या ताब्यातील ट्रक घेऊन येत असलेला दिसला व त्याने भरधाव वेगात ट्रॅक्टरचालक हिरामन भोई याला जोराची धडक दिली. त्यावेळी हिरामन भोई हा रस्त्याच्या कडेला पडला. त्यावेळी हा अज्ञात ट्रकचालक ट्रकची लाईट बंद करून करमाळ्याच्या दिशेने निघून गेला. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे दोनच्या दरम्यान घडली होती. त्यानंतर ट्रॅक्टरचालकास उपचारासाठी दवाखान्यात पाठवले होते. या ट्रॅक्टर चालकाचा १३ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान पहाटे दोन वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी अज्ञात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.