चोरीची वाळू घेवून जाणाऱ्या ट्रक चालकास पकडले – ट्रक व वाळूसह ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.६) : कोंढारचिंचोली (ता.करमाळा) गावात जाणाऱ्या चौकात गस्त करत असताना चोरीची वाळू घेवून जाणाऱ्या ट्रक चालकास पोलिसांनी पकडले असून त्याच्याजवळील ट्रक व वाळूसह जवळपास ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि घटना आज (ता.६) पहाटे पावणेचार वाजता घडली आहे.
यात हकीकत अशी की, यातील पोलीस कॉन्सटेबल अमोल बापूराव जगताप यांनी करमाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले कि, कोंढारचिंचोली (ता.करमाळा) गावात जाणाऱ्या चौकात आज (ता.६) पहाटे ४ वाजण्याचा सुमारास मी व सोबत पोहे श्री. रणदिवे, पोक श्री. लोंढे गस्त करत असताना, त्या परिसरात फिरून येवून थांबलो असताना माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, भिगवणकडून टाकळीकडे एका सहा चाकी ट्रकमध्ये चोरून वाळू वाहतूक करणार आहे, अशी माहिती मिळाल्याने जाणारे येणारे दोन इसमांना माहितीप्रमाणे हकीकत सांगून ते पंच म्हणून येण्यास तयार झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ व पंच असे कोंढारचिंचोली गावात जाणारे चौकात नाकाबंदी करत थांबलो. थोडयावेळाने भिगवण ते टाकळी जाणारे रोडने भिगवन कडून टाकळी (ता.करमाळा) कडे जाणारे रोडने एक सहा चाकी ट्रक भरधाव वेगाने आला.
त्यावेळी आम्हास त्याची शंका आल्याने मी व पोहे श्री रणदिवे, पोक श्री.लोंढे यांनी हाताने इशारा करून सदरचा ट्रक कोंढारचिंचोली गावात जाणारे चौकात थांबविला, दोन पंच यांनी सदर ट्रकमध्ये काय आहे हे पाहिले असता सदर ट्रकमध्ये वाळू भरलेली होती. सदर ट्रकचा नंबर एम एच 14 बी.जे. 5979 असा आहे. सदर ट्रकचा चालक यास दोन पंचासमक्ष त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सतीश शंकर मंजुळे, (वय 31 वर्षे) रा.केत्तूर नं 2 (ता.करमाळा) असे सांगितले.
सदर इसमास दोन पंचासमक्ष वाळूची रॉयल्टी पावती आहे काय? याबाबत विचारले असता, त्यांनी वाळू वाहतूक परवाना रॉयल्टी नसलेबाबत सांगितले. सतीश शंकर मंजुळे यास सदरची वाळू कोठून आणली आहे ? याबाबत दोन पंचासमक्ष विचारले असता त्याने सदरची वाळू ही मलठण जि.पुणे येथील भिमा नदीचे चोरून पात्रातून आणलेबाबत सांगितली आहे. सदर ट्रक नंबर एम एच 14 बी.जे.5979 यामधील वाळू ही चोरीची असल्याची खात्री झाल्यानंतर पोहेक श्री.रणदिवे यांनी सदरची ट्रक व वाळू जागीच दोन पंचासमक्ष जप्त करून मालजप्ती पंचनामा केला असून सदरची ट्रक हा त्यामधील वाळूस करमाळा पोलीस ठाणे आवारात आणला आहे. यात जवळपास पाच लाख रुपये ट्रक व वाळू ३० हजार असा एकूण 5,30,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.