केम : प्रगतीच्या उंबरठ्यावरच दुर्लक्षित गाव

करमाळा तालुक्यातील केम गाव हे नाव घेताच डोळ्यासमोर येते ती संस्कृती, श्रद्धा, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक जाणिवेची एक सशक्त पिढी. कुंकू निर्मितीपासून शिक्षण संस्था आणि राजकीय सामर्थ्यपर्यंत केमने अनेक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, कुर्डुवाडी जनता बँकेचे अध्यक्ष पद अशा महत्त्वाच्या पदाबरोबरच राजकारणात एकोपा असलेले गाव आहे. पण या सगळ्यांच्या पलीकडे असूनही काही मूलभूत प्रश्न गावाच्या सर्वांगीण प्रगतीत अडथळा ठरत आहेत.
संपादकीय!

आजच्या घडीला हे गाव उद्योग, वाहतूक, वीज आणि पायाभूत सुविधा यामध्ये अद्यापही शासनाच्या ठोस कृतीची वाट पाहत आहे. केम गावाची कुंकवाच्या कारखान्याचे केंद्र म्हणून राज्यात ओळख आहे. अनेक उद्योजकांनी येथे स्वतःच्या कष्टातून कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हातभार लावत घर ते थेट बाजार अशी व्यावसायिक जिद्द दाखवली आहे. हे गाव श्रमसंस्कार आणि उद्योगशीलतेचं मूळ ठिकाण आहे.

याच गावात उत्तरेश्वर, घुटकेश्वर, शंकरेश्वर, दक्षिणेश्वर, मध्यमेश्वर, केमेश्वर तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि राम मंदिर यासारखी प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक मंदिरे आहेत. ती गावाचा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपत आहेत. ही स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता आली तर गावाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते.

राजकीय दृष्ट्या केम हे एक प्रभावी गाव आहे. तालुक्याच्या राजकारणात गावातील नेतृत्वाची मजबूत पकड आहे. सामाजिक भान आणि नेतृत्व कौशल्य या बाबतीत केमने इतर गावांसाठी आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातही गावाने प्रगती केली असून वेगवेगळ्या माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, दर्जेदार प्राथमिक शाळा आणि शिक्षण संस्थांमुळे हे गाव विद्यार्जनाचे केंद्र ठरत आहे.

पण दुर्दैव असे की, हे सारे असूनही गाव आजही काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. केम हे रेल्वे स्टेशन असलेले गाव आहे. मात्र एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबा नाही. प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरील मालधक्का इतरत्र स्टेशनवर हलविण्याबाबत व मालगाड्या कुर्डुवाडी स्टेशनवर न जाता थेट पंढरपूरला जाण्यासाठी कॉर्ड लाईन निर्माण करण्यास मध्य रेल्वे प्रशासन आग्रही असल्याचे समजते.

तोच मालधक्का केम रेल्वे स्टेशनवर केल्यावर व केम ते लऊळ कॉर्ड लाईन निर्माण केल्यास केम गावाच्या विकासाला तसेच रोजगार वाढीस हातभार लागेल. यासाठी केम ग्रामस्थांना पाठपुरावा करावा लागेल. एवढ्या मोठ्या गावात अद्यापही बसस्थानक नाही. प्रवाशांना पावसात उभे रहावे लागते. वृद्ध, महिला, लहान मुलांना बसस्थानक नसल्याने गैरसोयींना तोंड द्यावे लागते. एवढेच नव्हे तर या गावातून जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. खराब रस्त्यामुळे वाहतूक किचकट होते. दुर्घटनांचा धोका वाढतो.

यासोबतच वीजपुरवठा अपुरा असल्यामुळे कुंकू उद्योग, शेती आणि लघुउद्योजकांना अडथळे निर्माण होतात. वीजेच्या असुविधांमुळे ग्रामस्थांना उपोषण या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, ही बाब शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. केम सारख्या प्रगतशील आणि उद्योगक्षम गावासाठी सरकारने औद्योगिक वसाहतीस मंजुरी दिली असली तरी ती अजूनही कागदावरच आहे. प्रत्यक्षात पायाभूत सुविधा नाहीत. उद्योगांना आकर्षित करण्याची पायाभरणी पूर्ण झाली नाही.

केम गावासारख्या गावामध्ये सामर्थ्य आहे – श्रमाचे, नेतृत्वाचे, शिक्षणाचे आणि सांस्कृतिक एकतेचे. पण त्या सामर्थ्याला दिशा देण्यासाठी आणि बळकटी देण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाने ठोस योजना, निधी आणि तात्काळ कृती केली पाहिजे. रेल्वे थांबा, वीजसंच, रस्ते, औद्योगिक सुविधा यासाठी तातडीने कृती आराखडा हवा.

आज गरज आहे ती केम गावाला ‘अविकसित’ नव्हे तर ‘विकसनशील गाव’ म्हणून मान्यता देण्याची आणि त्यांच्या गरजांवर गंभीरपणे लक्ष देण्याची. केम गाव जर आपल्या सर्व बाजूंनी सक्षम होत गेलं, तर ते केवळ करमाळा तालुक्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे एक आदर्श ग्रामीण मॉडेल ठरू शकते; हे विसरून चालणार नाही..!
✍️डॉ.अॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०