जिल्हास्तरीय शालेय कथाकथन स्पर्धेत पोथरे येथील समृद्धी झिंजाडे जिल्ह्यात प्रथम
करमाळा (दि.१७) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोथरे (ता.करमाळा) या शाळेची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिने जिल्हास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेअंतर्गत आयोजित कथाकथन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या स्पर्धा काल (दि.१६) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मोडनिंब (ता. माढा) येथे घेण्यात आल्या होत्या.ही स्पर्धा छोटा व मोठा गट अशा दोन गटात झाली. सातवीच्या वर्गातील शिकणाऱ्या समृद्धीचा मोठ्या गटात सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमधील टॅलेंट (गुणवत्ता) शोधून त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या.या स्पर्धा प्रथम केंद्रस्तरावर घेण्यात आल्या.त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर स्पर्धा झाल्या. तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर संधी देण्यात आली होती.मोठ्या गटात पूर्ण जिल्ह्यातून एकूण 22 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेनंतर समृद्धीस माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशिगंधा माळी यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
समृद्धीला तिच्या वर्गशिक्षिका शगुफ्ता शेख (हुंडेकरी) यांनी मार्गदर्शन केले. समृद्धीच्या या यशाबद्दल करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्ताराधिकारी जयवंत नलवडे, पोथरे केंद्राचे केंद्रप्रमुख निशांत खारगे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बप्पासाहेब शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक गजेंद्र गुरव यांनी समृद्धी आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.