वडशिवणे गावचा सुपुत्र भगवंत पवार उत्कृष्ट गुणांनी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण – डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण

केम(संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील वडशिवणे गावचा सुपुत्र भगवंत गणेश पवार याने एमबीबीएस परीक्षा उत्कृष्ट गुणांनी पास होत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. एम्स हैदराबाद याठिकाणी त्याचे शिक्षण सुरू होते. विशेष म्हणजे जनरल सर्जरी विषयामध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवले आहे.
डॉ.भगवंत पवार याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वडशिवणे तालुका करमाळा येथे मराठी माध्यमातून झाले असून गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या स्थापनेपासूनचा ते पहिला डॉक्टर विद्यार्थी ठरले आहेत. दहावी मध्ये त्याने 95.20% गुण मिळवले आहेत अकरावी बारावी सायन्स सोनवणे कॉलेज उक्कडगाव येथे झाले आहे बारावी बोर्ड मध्ये 91.23% गुण मिळवून त्यानंतर वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट 2020 मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये 645 गुण मिळवून ते एम्स हैदराबाद या ठिकाणी प्रवेश पात्र ठरले एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात तीन गोल्ड मेडल मिळवले दुसऱ्या वर्षी ब्राँझ मेडल मिळवत शेवटच्या फायनल परीक्षेमध्ये सर्व विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळवत जनरल सर्जरी या विषयांमध्ये गोल्ड मेडलचे मानकरी ठरले.
वैद्यकीय शिक्षण चालू असताना मध्यंतरी वेल्लोर (तामिळनाडू ),चेंगलपट्टू (तामिळनाडू ),एम्स भोपाळ (मध्य प्रदेश ),एम्स भुवनेश्वर (ओरिसा ),कानपूर (उत्तर प्रदेश) या पाच ठिकाणी कॉलेजतर्फे स्पर्धेसाठी उपस्थित राहून प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले .नोव्हेंबर 2024 मध्ये कानपूर येथे बालरोग शास्त्र (पीडियाट्रिक्स )या विषयात पाच राज्यांच्या झोनलमधून तो प्रथम आलेले आहे. शैक्षणिक दृष्ट्या मागास अशा वडशिवणे सारख्या छोट्याशा गावामध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेत उच्च प्रतीचे यश मिळवण्याचे काम भगवंत पवार याने केलेले आहे. विशेष म्हणजे गुणवत्ता असेल तर शिक्षणासाठी पैसा लागत नाही हे भगवंत यांनी दाखवून दिलेले आहे त्यांच्या संपूर्ण एमबीबीएसच्या शिक्षणाची फी हॉस्टेलसह केवळ 5856 रुपये होती त्याला गुणवत्तेमुळे ओएनजीसी या केंद्र सरकारच्या कंपनीतर्फे प्रतिवर्ष 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली त्यांचे एकूण शिक्षणच मोफत झाले.
भगवंत याने मिळवलेले यश निश्चितच ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे त्याच्या मार्गदर्शनातून परिसरातील अनेक विद्यार्थी आज मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहेत व भविष्यातही ते गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहेत त्याने मिळवलेल्या यशाबद्दल सरपंच रत्नाकर कदम, हिराचंद ओस्तवाल, रामचंद्र व्हरे, काका व्हरे, बळिराम गुरव, युवा नेते अजित तळेकर पत्रकार संजय जाधव संचालक सागर दौड, मोरक्षक परमेश्वर तळेकर,गोरख जगदाळे, प्रसाद पाठक यांनी अभिनंदन केले. त्याचे करमाळा तालुक्यातून कौतूक होत आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल पवार कुटूंबाकडून व मित्रपरिवाराने आनंद उत्सव साजरा केला जात आहे.




