सीताफळ, पेरू पाठोपाठ केळीने दिला दणका! चिलींगच्या नावाखाली केळी उत्पादकाची लुट

करमाळा (दि.२०) – यावर्षी पावसाने शेतकऱ्याला साथ दिली, पण बाजारभावाने दणका दिल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. शंभर, सव्वाशे रूपये किलो प्रमाणे जाणारे सीताफळ चक्क पंधरा ते तीस रूपये किलोने विकले जातात. ८० ते १०० रूपये किलो जाणारा पेरू चक्क २० ते ३० रूपये किलोने विकला जावू लागला आहे. आता केळीचीही तिच गत झाली असून ३० रूपये किलोने जाणारी केळी चिलींगच्या नावाखाली ९ ते १० रूपये किलोने मागितली जात आहे आणि शेतकऱ्यांना त्याच भावात केळी विकावी लागत आहे. अशा स्थितीत शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे; अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
जळगाव पाठोपाठ केळी उत्पादनात करमाळा तालुका अग्रेसर आहे. उजनी परिसरात उत्पादीत होणारी केळी संपूर्ण तालुक्यात उत्पादीत होवू लागली आहे. केळीचे पीकही जोमदारपणे येत आहे. अशा स्थितीत केळीला भावही चांगला मिळत आहे. गेल्या दोन महिन्याखाली ३० ते ३२ रूपये किलो जाणारी केळी गेल्या नोव्हेंबर महिन्यात २५ ते २६ रूपये किलो झाली. डिसेंबर मध्ये थंडी वाढली आणि केळीवर चिलींग आले (चिलींग म्हणजे केळीच्या वरील दोन पडद्यात जखम होणे.) दुर्दैवाने चिलींगचा माल हा निर्यात होत नाही. त्यामुळे चिलींग झालेली केळी ही देशातच पर्यायाने राज्यातच विकावी लागते. अशा स्थितीत स्थानिक व्यापाऱ्यांनी चिलींगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट चालवली आहे. बाजारात ४० रूपये डझन विकणारी केळी शेतकऱ्याकडून ९ ते १० रूपये किलोने घेतली जात आहेत. चिलींगमुळे केळीच्या चवीवर कोणताही परिणाम होत नाही. केवळ वरील रंग पिवळा एावजी राखट रंग होतो. स्थानिक बाजारात चिलींगचा मालही त्याच दराने विकला जात आहे. असे असलेतरी शेतकऱ्याचा दर मात्र निचांकी दिला जात आहे.
तुर, मका, कांदा या पिकांना शासनाकडून हमीभाव मिळतो. त्याच धर्तीवर केळीलाही हमीभाव दिला पाहिजे. एवढेच नाहीतर ज्या शेतकऱ्यांच्या केळी पिकावर चिलींग येते अशा शेतकऱ्यास शासनाने तात्काळ अनुदान दिले पाहिजे तरच केळी उत्पादक शेतकरी जगेल. याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावेत.
●निवृत्ती सुरवसे (भोसे, केळी उत्पादक शेतकरी)




