इंस्पायर अवॉर्डच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी चिखलठाणच्या शिवानंदची करमाळा तालुक्यातुन एकमेव निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Science and Technology) वतीने दरवर्षी विविध राज्यातील मुलांच्या उत्कृष्ट प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना इंस्पायर अवॉर्ड दिली जातात. २०२२-२३ या वर्षासाठीच्या इंस्पायर अवॉर्डच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी महाराष्ट्रामधून १६४९ मुलांची निवड झाली असून सोलापूर जिल्हयातून ७४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये चिखलठाण (ता.करमाळा) शिवानंद संतोष धारक या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
शिवानंद हा करमाळा तालुक्यातील एकमेव विद्यार्थी निवडला गेला आहे. तो सध्या चिखलठाण (ता.करमाळा) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे.
शिवानंदने अंध लोकांसाठी बूट बनविण्याच्या प्रकल्पाची संकल्पना मांडली आहे. त्याच्या या प्रकल्पाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली असून त्याला हा प्रकल्प तयार करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहेत. त्यानंतर प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर हा प्रकल्प सादर केला जाणार आहे.
शिवानंद धारकच्या या यशाबद्दल सुराणा विद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य संदीपान तात्याबा बारकुंड, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षेकतर कर्मचारी, पालक व नागरिक उपस्थित होते. या निवडीनंतर शिवानंद व त्याच्या शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.