यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थिनींनी लुटला पंचमीच्या पारंपारिक खेळांचा आनंद…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आयोजन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आले. याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थिनींना भारतीय संस्कृतीत असणारे पंचमीचे महत्त्व सांगण्यात आले. यामध्ये झोके , फुगड्या , झिम्मा अशा पारंपरिक खेळाचे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व पटवून दिले. यावेळी महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक संगीता नाईक या उपस्थित होत्या. या पंचमी महोत्सवानिमित्त महाविद्यालयातील झाडांना झोके बांधण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या फुगड्या , झिम्मा , फेराची पारंपारिक गाणी पारंपरिक गाणी , पारंपरिक वेशभूषा , पारंपरिक खेळ इत्यादीचा उत्स्फूर्तपणे मनमुराद आनंद लुटला . त्यामुळे महाविद्यालयात सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख , प्रा. सुजाता भोरे , प्रा. संध्या बिले , प्रा. सुरेखा जाधव , प्रा.मुक्ता काटवटे , प्रा. निता माने , सौ. अनिता देशमुख- साठे यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमासाठी 377 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.