करमाळ्यात २१ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत नृत्य महोत्सवाचे आयोजन
करमाळा : करमाळा ( जि. सोलापूर) येथे आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, हा कार्यक्रम कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालय करमाळा यांच्या वतीने आयोजित केला आहे. दि.21 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वा. प्राथमिक शिक्षक जिल्हा सोसायटी पतसंस्था, देवीचा माळ रोड, करमाळा येथे पं. के एन बोळंगे गुरुजी आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांची पुण्यतिथी तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवासाठी वेगवेगळ्या राज्यातून आणि परदेशातून ही अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. या संगीत महोत्सवात येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने विविध नामांकित अशा कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या महोत्सवातील खास वैशिष्ट्ये म्हणजे विविध प्रकारच्या शास्त्रीय नृत्य शैलीचा रसिकांना आनंद घेता येणार आहे. यामध्ये कथक, भरतनाट्यम, ओडिसी, भारतीय समकालीन, सत्रिय, कुचीपुडी इत्यादी नृत्य प्रकाराचे सादरीकरण होणार आहे. दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे या उत्सवात नजरूल हा गीत प्रकारही रसिकांना ऐकावयास मिळणार आहे. विद्यालयातील विद्यार्थी ही यावेळी अनेक गीत प्रकाराचे आणि वादनाचे सादरीकरण करणार आहेत.
करमाळा तालुक्यामध्ये प्रथमच अशा वेगवेगळ्या प्रकारचे गायन आणि नृत्य प्रस्तुतीकरण होणार आहे. त्यामुळे हा सुरताल संगीत महोत्सव म्हणजे करमाळा वासियासाठी संगीतमय पर्वणीच ठरणार आहे. या संगीत महोत्सवाचा तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.