बांधकामाचे ६२ हजार किंमतीचे सेंट्रींग साहित्य गायब – अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कोर्टी (ता. करमाळा) येथे अज्ञात चोरट्यांनी ६२ हजार रूपये किंमतीचे बांधकामातील सेंट्रींग साहित्य लंपास केले आहे. या प्रकरणी सागर झुंबर सायकर यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी राठीराशीन (ता.कर्जत, जि. अहमदनगर) येथील रहिवाशी असून, सध्या अशोक नारायण शिंदे (रा.कोर्टी, ता. करमाळा) येथे बांधकामाचे सेंट्रिंग काम करत आहे.
२९ सप्टेंबरला नेहमीप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांसोबत काम उरकून सायंकाळी सहा वाजता पत्राशेड मध्ये सर्व सेंट्रींगचे साहित्य ठेवून घरी गेलो. दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सेंट्रींगचे काम करण्यासाठी आलो असता, त्याठिकाणी आम्हाला साहित्य दिसून आले नाही.
या साहित्यामध्ये लोखंडी प्लेटा, लाकडी फळ्या, कटर मशीन, लाकडी दांड्या, हातोडा असे एकूण ६२ हजाराचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी पळविल्याचे लक्षात आले. याप्रकरणी करमाळा पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.