घरकुल योजनेत ७४२ घरांसाठी ८ कोटी ९० लाख ४० हजार रू मंजूर
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तालुक्यातील १०८ ग्रामपंचायती व ११८ गावामध्ये आवास प्लस योजनेमध्ये (ड फार्म) १३ हजार ७२४ लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादी आहे. यामध्ये यावर्षी ९८६ लाभार्थ्यांचे उद्दीष्ट असताना त्यात ७४२ लाभार्थ्यांना घरकुलासाठी ८ कोटी ९० लाख ४० हजार रूपये मंजूर झाले आहेत. संबंधित लाभार्थ्यांना याची माहिती दिली असून, त्यांनी तीन महिन्याच्या मुदतीत आपली घरे पूर्ण करावीत; असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले.
याबाबत जादा माहिती देताना गटविकास अधिकारी राऊत म्हणाले, की आवास प्लस योजनेतून मंजूर झालेल्या ७४२ घरकुला पैकी ३२ घरकुले पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून २०१७ ते २०२२ पर्यंत ३३५५ घरकुलाच्या उद्दीष्टापैकी ३१०० घरकुलांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ३७ कोटी २० लाख रूपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी २३३७ घरकुले पूर्ण झाली आहेत.
रमाई आवास योजनेतून २०१७ ते २०२२ पर्यंत १९८० घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी २३ कोटी ७६ लाख रूपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत १३७२ घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित घरकुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. शबरी आवास योजनेतून २१ घरकुले मंजूर झाले असून त्यातील १२ घरकुले पूर्ण झाली आहेत तर उर्वरित प्रगतीपथावर आहे. पारधी आवास योजनेतून सात घरकुले मंजूर असून सातच्या सात पूर्ण झाली आहेत.
या योजनेतून ज्या लोकांना अद्याप लाभ मिळाला नाही किंवा प्रतिक्षा यादीत नाहीत; अशा वंचित लाभार्थ्यांनी आपली नावनोंदणी ग्रामपंचायतीकडे तात्काळ करावी; असे आवाहन कनिष्ठ सहाय्यक वैभव माने यांनी केले.
घरकुल योजनेसाठी एक घर बांधण्यासाठी १ लाख २० हजार रूपये मंजूर होतात तसेच रोजगार हमीतून काम केल्यास २२हजार रूपये दिले जातात. हे काम मंजुरी मिळाल्यापासून तीन महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यास जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांना पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतून ५० हजारा पर्यंत अनुदान मिळू शकते. यावर्षी ३० लाभार्थ्यांना हे अनुदान देण्यात आले असून, नव्याने २२ प्रस्ताव दाखल झाले आहेत. जी प्लस १ योजनेतून डबल मजला बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्यांना जागा कमी आहे, त्यांना या योजनेचा फायदा होत असून आत्तापर्यंत कोंढारचिंचोली, बिटरगाव (वांगी), पोथरे, गुळसडी या गावात पाच घरकुले बांधण्यात आली आहेत. – मनोज राऊत (गटविकास अधिकारी करमाळा)