छ. संभाजीराजे जयंतीनिमित्त पारंपरिक युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांसह करमाळ्यातून भव्य मिरवणूक निघणार

करमाळा(दि.१३): छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती यंदा १४ मे रोजी करमाळा येथे उत्साहात व पारंपरिक ढंगात साजरी होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, करमाळा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता पोथरे नाका येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दुपारी ४ वाजता महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येईल. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मर्दानी खेळ, दांडपट्टा, तलवारबाजी अशा पारंपरिक युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण. बालगोपाळ व युवकवर्ग यामध्ये सहभाग घेऊन इतिहासाची जिवंत झलक सादर करणार आहेत.

मिरवणुकीचे विशेष आकर्षण श्रीराम समर्थ लाइट्स आणि रायगड डेकोरेशन राहणार आहे.जयंती उत्सव समिती, करमाळा शहर व तालुका यांच्यावतीने सर्व शिवभक्त व समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




