आरोपीला फाशी, गृहमंत्र्यांचा राजीनामा या मागण्यांचे तहसीलदारांना दिले निवेदन

केम (संजय जाधव) – बदलापूर येथे चार वर्षाच्या बालिकांवरती अत्याचार करण्यात आला याच्या निषेधार्थ व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीचे निवेदन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नायब तहसीलदार विजय लोकरे यांच्यामार्फत दिले.

पश्चिम बंगाल येथे डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यात आले ही घटना ताजी असतानाच 12 ऑगस्ट रोजी बदलापूर येथे शाळेमध्ये चार वर्षाच्या दोन बालिकांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. गुन्हा नोंद करून घेण्यास पोलिसांनी उशीर लावला रात्रीच्या बारा वाजेपर्यंत पालकांना पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत बसावेे लागले. ज्यावेळेस ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली त्यावेळेस लोकांनी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या म्हणून 20 ऑगस्ट रोजी बदलापूर रेल्वे स्टेशन वरती फार मोठे रेल रोको आंदोलन केले. अखेर आंदोलन कर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन मोडीत काढले. महाराष्ट्रात वारंवार महिलांवरती अत्याचार होतात मग महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा व गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिले आहे.

सदर निवेदन नायब तहसीलदार लोकरे यांनी स्वीकारले आहे. यावेळी उपस्थित मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, संदीप मारकड, इरफान शेख, इसाक शेख, कयूम शेख, लालमन भोई, बाळासाहेब चव्हाण, अनिल कोकाटे, रोडे, पालवे, अंकुश वलटे, नवनाथ कोठावळे, धनंजय शिंदे, रमेश भोसले, सुरेश जाधव, बोराडे, शिवा चोरमले, आधी जण उपस्थित होते.



