घरतवाडीतील मतदान बहिष्कार तात्पुरता मागे; पालकमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे आदेश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील घरतवाडी व परिसरासह येथील ग्रामस्थांनी जाहीर केलेला मतदानावरील बहिष्कार तात्पुरता मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या ठाम भूमिकेची दखल घेत पालकमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास प्रमुख मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

घरातवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात चिखलमय रस्ते तर उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा, शेतकऱ्यांचे काम, रुग्णांचे उपचारासाठी जाणे तसेच ज्येष्ठ नागरिकांची हालचाल अत्यंत कठीण झाली होती. या गंभीर समस्यांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ग्रामसभेत एकमताने मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा अधिकृत ठरावही ग्रामसभेत मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात निवडणूक प्रक्रियेबाबत मोठी चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, या बहिष्काराच्या निर्णयाची गंभीर दखल घेत पालकमंत्री कार्यालयाने तातडीने हस्तक्षेप केला. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश देण्यात आले. या सकारात्मक प्रतिसादानंतर ग्रामस्थांनी मतदान बहिष्कार तात्पुरता मागे घेण्याचा निर्णय घेतला.

याबाबत माहिती देताना कुंभारगाव ग्रामपंचायतीचे सदस्य अनिकेत गायकवाड यांनी सांगितले, “घरातवाडी परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होती. अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नव्हती. मात्र, पालकमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीची कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्कार तात्पुरता मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या बहिष्कार मागे घेतल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून, प्रशासन पुढे नेमकी कोणती पावले उचलते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

