वैष्णवी पाटीलचे आंतरराष्ट्रीय यश; कोरियातील स्पर्धेत सांघिक रौप्यपदक - Saptahik Sandesh

वैष्णवी पाटीलचे आंतरराष्ट्रीय यश; कोरियातील स्पर्धेत सांघिक रौप्यपदक

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : दक्षिण कोरिया येथे दि. ९ ते १४ ऑगस्टदरम्यान झालेल्या WA-KAA Invitational Youth Championship आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत वरकुटे गावची कन्या कुमारी वैष्णवी पाटील हिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत सांघिक रौप्यपदक पटकावले. वैष्णवीचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक असून तिच्या या यशामुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दि. २९ जून २०२६ रोजी सोनीपत, हरियाणा येथे झालेल्या निवड चाचणीत वैष्णवी पाटील हिची भारतीय संघात निवड झाली होती. या निवडीतूनच तिला दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली.
या स्पर्धेत वैष्णवी पाटील हिच्यासोबत सातारा येथील आदिती स्वामी आणि जालना येथील तेजल साळवे यांनी भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. तिघींनी उत्कृष्ट कामगिरी करत भारताला सांघिक रौप्यपदक मिळवून दिले. भारतीय महिला संघाची ही कामगिरी देशासाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

वैष्णवी पाटील सध्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमध्ये बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. ती सातारा येथील दृष्टी आर्चरी अकॅडमी येथे प्रशिक्षक प्रवीण सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंदाजीचा सराव करते.
दरम्यान, आगामी काळात याच भारतीय संघासमोर एशिया कप दुबई तसेच चीन येथे होणाऱ्या स्पर्धांचे आव्हान असणार आहे. तसेच इराक येथे होणाऱ्या चॅम्पियनशिपमध्येही भारतीय संघ सहभागी होणार आहे. त्यामुळे वैष्णवीसह भारतीय महिला संघ आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज झाला आहे.

वैष्णवी पाटील हिने मिळवलेल्या या पहिल्या आंतरराष्ट्रीय पदकाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामुळे वरकुटे गावासह संपूर्ण करमाळा तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!