
करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा हमाल पंचायतचे संस्थापक, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा येथे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हरिकीर्तन, अभिवादन कार्यक्रम तसेच भव्य रक्तदान शिबिराचा समावेश आहे. अशी माहिती हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी दिली.
शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजप्रबोधन बाल कीर्तनकार छोटे इंदुरीकर, ह.भ.प. माऊली काकडे महाराज यांच्या हरिकीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात येणार आहे.
तसेच स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास भेटस्वरूपात पाण्याचा जार देण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा तालुका हमाल पंचायत आणि करमाळा छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सर्व कार्यक्रम सावंत गल्ली, मारुती मंदिराजवळ, करमाळा येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




