तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आळसुंदे-वरकुटे शिवरस्त्याचे रास्ता रोको आंदोलन मागे

करमाळा(दि.११): आळसुंदे – वरकुटे शिवरस्त्याच्या प्रलंबित प्रश्नासाठी शुक्रवारी ११ एप्रिल रोजी राणा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आळसुंदे व वरकुटे येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांनी करमाळा-कुर्डवाडी रस्त्यावर आळसुंदे गावाजवळ हे रास्ता रोको आंदोलन केले.

सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेले हे आंदोलन जवळपास तीन तास चालले. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून आंदोलकांनी त्यांना जाण्यासाठी थोडा मार्ग खुला करून दिला होता. यावेळी महसूल विभागाकडून अधिकारी श्रीमती काझी, तलाठी ज्ञानेश्वर सलगर, वरकुटेचे मंडल अधिकारी भाऊसाहेब पाटील हे उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासनाकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शिवरस्ता तयार करून देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. प्रशासनाशी चर्चा करत असताना आंदोलन नेते राणा वाघमारे जेसीबीच्या बकेटवर उभा राहीले. प्रशासनाबरोबर त्यांनी तिथूनच संवाद साधला. शिवरस्ता हा न्यायप्रविष्ट असल्याचे प्रशासनाकडून सुरवातीला सांगण्यात आले, मात्र या रस्त्यावर कुणीही दावा करू शकत नाही, असा ठाम विश्वास वाघमारे यांनी व्यक्त केला.

उन्हाळ्यात पाण्यासाठी टँकर आणताना व शेतीमाल वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट केले. तहसीलदार आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या. अग्निशमन दलाची गाडी आणून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी हा बनाव ओळखून गाडी पुढे जाऊ दिली नाही. एका महिलेने आक्रमक होत सदर गाडीच्या ड्रायव्हरला खाली उतरवून गाडीचा ताबा घेतला.

बराचवेळ आंदोलक आणि प्रशासन यांच्यात वाटाघाटी झाल्या. यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. पुढील निर्णयासाठी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला करमाळा येथे बोलावण्यात आले. तेथे झालेल्या बैठकीत, भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे पारदर्शकपणे मोजमाप करून रस्त्याच्या सीमारेषा निश्चित करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. तसेच पोलिस बंदोबस्तात हा रस्ता करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार ठोकडे यांनी आंदोलकांना दिले.

या आंदोलनात १६ ते १७ आंदोलकांवर व दोन वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे आंदोलन तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानुसार स्थगित करण्यात आले आहे. १५ एप्रिलपर्यंत शिवरस्ता तयार न झाल्यास पुढील आंदोलन तहसीलदारांच्या निवासस्थानासमोर करण्याचा इशारा आंदोलन नेते राणा वाघमारे यांनी दिला आहे.


