दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी टेल भागाला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप; १५ एप्रिल रोजी रास्ता रोकोचा इशारा

करमाळा (दि.१२) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टेल भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी सरपंच रवींद्र वळेकर यांच्या नेतृत्वाखाली ७ एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन होणार होते. मात्र, पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि, अद्यापही टेल भागामध्ये पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक टेल भागातील शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य विलास राऊत यांनी केला आहे. तसेच, १४ एप्रिल २०२५ पर्यंत टेल भागात पाणी न पोहोचल्यास १५ एप्रिल रोजी करमाळा-कुर्डुवाडी मार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाबाबतचे निवेदन तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आणि पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहे.
दरम्यान, उपअभियंता, कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२, करमाळा यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “आम्ही आपल्या कार्यालयाकडे पाण्याची रीतसर मागणी अर्जाद्वारे केली आहे. दि. २० मार्च रोजी सुरू झालेल्या दहिगाव योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे पाणी अद्याप टेल भागांमध्ये पोहोचलेले नाही. योजनेच्या लाभक्षेत्रात नसलेल्या गावांना सर्रासपणे पाणी दिले जात असताना, टेल भागातील लव्हे, निंभोरे, घोटी, वरकुटे आदी गावांना पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे.”
शेतकऱ्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, दि. १४ एप्रिल २०२५ पर्यंत टेल भागातील गावांना पाणी सोडण्यात यावे, अन्यथा दि. १५ एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. याची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान!

निवेदन दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना श्री. राऊत म्हणाले की, पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार पाणी टेल टू हेड या पद्धतीने दिले जाते. विद्यमान लोकप्रतिनिधींनी या योजनेचा बोजवारा उडवला असून योजना सुरू होऊन ३ आठवडे झाले तरीसुद्धा अजून घोटी या गावासह इतर पंचक्रोशीतील गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. आमदारांसह त्यांच्या कुटुंबातील २-३ व्यक्ती कॅनॉलवर फिरूनही त्यांना साधी दहिगाव योजना चालवता येत नाही. १० पंप असलेली योजना जर यांना चालवता येत नसेल तर अशा लोकांच्या हातात कारखाना गेल्यानंतर ते कारखाना काय चालवणार ? असा मार्मिक टोला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काका राऊत यांनी पाटील गटाला लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या पंचवार्षिकमध्ये प्रत्येक वर्षी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी दिले जात होते. त्यामुळे उन्हाळी आवर्तन 100 दिवस चालवले जायचे. या सातत्यपूर्ण पाण्यामुळे दहिगाव पट्ट्यातील शेतकऱ्यांचा विश्वास या योजनेवर बसला आणि या शेतकऱ्यांनी पाईपलाईन, शेततळी हे करण्याबरोबरच केळी आणि तरकारी, फळबाग,ऊस अशी बारमाही पिकांसाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आणि तसे उत्पन्नही या शेतकऱ्यांना मिळाले.परंतु नारायण पाटलाच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका 24 गावातील शेतकऱ्यांना बसणार असून प्रत्यक्ष या शेतकऱ्यांच्या पिकांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
