चिवटे यांच्या इशाऱ्यानंतर सफाई कामगारांना ठेकेदाराकडून दोन महिन्यांचा पगार अदा

करमाळा(दि.१२): करमाळा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या ५३ कामगारांचे मागील तीन महिन्यांपासून ठेकेदाराकडून पगार थकवण्यात आले होते.
सफाई कामगारांना हा ठेकेदार उलट सुलट उत्तर देत होता. सर्व सफाई कामगारांनी शिवसेना कार्यालयात येऊन आपली कैफियत जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे मांडली होती. यावर शिवसेनेने आवाज उठवून त्या कामगारांचे पगार दिले नाही तर ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला होता. ठेकेदाराचे दहा लाख रुपये डिपॉझिट जप्त करून त्यातून पगार करा अशी मागणी चिवटे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेची ठेकेदाराने दखल घेत तात्काळ या सफाई कामगारांचा दोन महिन्याचा पगार अदा केला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना श्री. चिवटे म्हणाले की, करमाळा नगरपालिकेने शहरात सफाई कामगार पुरवठा करण्याचा ठेका नाशिकच्या एका कंपनीला दिला असून या कंपनीला एका सफाई कामगारासाठी प्रतिदिन ६१९ रुपये अकुशल कामगारांसाठी व कुशल कामगारांसाठी ६७९ रुपये प्रति दिन पगार दिला जातो. मात्र संबंधित कंपनी नगरपालिकेच्या सफाई कामगारांना केवळ प्रतिदिन ३३० रुपये पगार गेली चार वर्षापासून देत आहे. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे ५३० रुपये प्रमाणे ठेकेदारांनी सफाई कामगारांना पगार दिला पाहिजे. कामगारांचा पीएफ ठेकेदाराने भरला पाहिजे. सफाई कामगारांना सर्व साहित्य गणवेश, बूट हत्यारे पोहोच केले पाहिजे. जोपर्यंत त्या ठेकेदाराची डिपॉझिट जप्त करून सफाई कामगारांची मागील देणे देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.




