जमिनीच्या वादातून प्रा.भारत बिचीतकर यांच्यावर हल्ला- सात जणांविरोधात गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.९: केम येथील प्रा. भारत बिचीतकर यांच्यावर जमिनीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी देत जोरदार हल्ला केला आहे. हा प्रकार ७ मे २०२६ रोजी सकाळी ११-१५ वा शेतात घडला आहे.याप्रकरणी संबंधित सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात प्रा. डाॅ.भारत बापू बिचितकर (वय ५४) रा. केम यांनी फिर्याद दिली. ते केम येथील रहिवासी असून सध्या बार्शी येथे प्राध्यापक आहेत. त्यांची करमाळा तालुक्यातील मौजे केम येथे शेती असून त्या जमिनीवरून गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित जमिनीबाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल असून न्यायालयाने त्यांच्या बाजूने स्थगिती आदेश दिलेला आहे. मात्र तरीही आरोपींकडून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि. २६ एप्रिल २०२६ रोजी रात्री भाजी मंडई परिसरात सासू कुसूम गावडे, मेहुना गजानन गावडे, तसेच उमेश इंगळेव सचिन तळेकर यांनी मला मारहाणीचा कट रचला.त्यांच्या सांगण्यावरुन दुसर्या दिवशी २७ मे ला सकाळी सव्वा अकरा वाजता अभिजित तळेकर , शंकर तळेकर, पंडित तळेकर व निखिल तळेकर हे कोयता, लोखंडी पाईप घेऊन आले तु आमच्या पाव्हण्याच्या जमीनीचा ताबा का सोडत नाही,जमिनीचा ताबा सोड, नाहीतर जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत माझ्यावर व वडीलावर हल्ला केला.पुतण्यास मारहाण करुन शुटींग काढत असलेला मोबाईल हिसकावून नेला आहे.
या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


