अल्पवयीन मुलीबरोबर बालविवाह केल्याप्रकरणी पतीयुवकाविरोधात गुन्हा दाखल

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.९: अल्पवयीन मुली बरोबर विवाह केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथील नवरदेव युवकाविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद ग्रामविकास अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी भाग्यश्री गाठे यांनी करमाळा पोलिस ठाण्यात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कर्मनवाडी येथील १६ वर्षे ६ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह पोंधवडी (ता. करमाळा) येथील विकास जगन्नाथ क्षीरसागर (वय ३१) याच्यासोबत २१ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री गाठे यांनी चाईल्ड लाईन टीम व करमाळा पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी भेट दिली.
यावेळी विवाह झाल्याचे निष्पन्न झाले असून संबंधित युवक, त्याचे वडील व भावाचे जबाब नोंदविण्यात आले. तसेच मुलीच्या जन्मतारखेच्या दाखल्यावरून ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. मुलीची जन्मतारीख २६ सप्टेंबर २००९ असून तिचे वय विवाहावेळी १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी नवरदेवाविरुध्द ४ मे २०२६ रोजी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९ व ११ नुसार करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


