शेटफळ येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तहसीलदारांच्या हस्ते मदत कीट वाटप

करमाळा (दि.१०):शेटफळ (ता. करमाळा) येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या कुटुंबांना तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते मदत कीटचे वाटप करण्यात आले. तसेच, शासनाकडून या कुटुंबांना आर्थिक मदतही मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाजवळील ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे काही कुटुंबांचे घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले होते. या सर्व कुटुंबांना प्रशासनाच्यावतीने मदत कीट देण्यात आली.
यावेळी सरपंच काकासाहेब गुंड, विलास लबडे, वैभव पोळ, नानासाहेब साळुंखे, कैलास लबडे, प्रशांत नाईकनवरे, सुभाष पोळ, गजेंद्र पोळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

तहसीलदार ठोकडे यांनी नुकसानग्रस्तांच्या घरांचे पंचनामे करून कोणतेही नुकसानग्रस्त कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची ग्वाही दिली. तसेच गावातील इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली.
अतिवृष्टीच्या काळात तत्परतेने आपत्ती व्यवस्थापन केल्याबद्दल जिजामाता शेतकरी महिला गटाच्या वतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला हर्षाली नाईकनवरे, मंदाकिनी साळुंके, निता पोळ, अश्विनी नाईकनवरे, लक्ष्मी पोळ, प्रतिभा पोळ, सुषमा पोळ, विद्या जाधव, गंगाताई लबडे, माधुरी साळुंके, जानवी पोळ यांच्यासह गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




