नेरले येथील घरात झाला स्फोट – घरातील विविध वस्तू, कागदपत्रांसह सुमारे ७० हजारांचे नुकसान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – नेरले (ता. करमाळा) येथील एका घरामध्ये काल (दि. २६ डिसेंबर) सायंकाळी ७ च्या सुमारास इलेक्ट्रॉनिक वस्तूचा स्फोट होऊन घरातील विविध वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
नक्की कशाचा स्फोट झाला हे ठामपणे समजले नसले तरी मोबाईलचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.या स्फोटामुळे अंदाजे ७० ते ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यात हकीकत अशी की नेरले येथील शेतकरी गणपत भगवान शहाणे व त्यांचा परिवार हे सर्व बाहेर असताना घरामध्ये अचानक कुठल्यातरी वस्तूचा स्फोट झाला व त्यातून आग लागली. घरातून धूर बाहेर यायला लागल्याचे दिसल्यानंतर जवळच असलेल्या लोकांनी ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले परंतु तोपर्यंत घरातील वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यामध्ये मोबाईल, टीव्ही, मिक्सर, फॅन, गाद्या, अंथरूण पांघरूण,कपडे, गहू-ज्वारी आदी धान्य, किराणा,अन्य घरगुती सामान तसेच आधार कार्ड सहित सर्व कागदपत्रे जळून खाक झाले.
यात विशेष म्हणजे शहाणे यांनी विवो कंपनीचा १३ हजार रुपयांचा मोबाईल मागच्या महिन्यातच हप्त्याद्वारे घेण्यात आला होता. त्याचा पहिला हप्ता देखील भरावायचा बाकी असल्याचे सांगण्यात आले. सदर घटना संबंधित परांडा येथील दुकानदाराला कळविली असल्याचे सांगण्यात आले.या घटनेनंतर तलाठी यांचे प्रतिनिधी म्हणून कोतवाल शिवाजी काळे यांनी येऊन पाहणी व पंचनामा केला.