तालुक्यातून अनिल यादव व सुवर्णा जाधव यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
करमाळा (दि.५) – शिक्षक दिनानिमित्त प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर या विभागामार्फत आज दि. 5 सप्टेंबरला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे करण्यात आलेले आहे.
या विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार दिला जातो. यावर्षी करमाळा तालुक्यातील दोन शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. उमरड येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक अनिल नानासाहेब यादव व वांगी क्र १ येथील उपशिक्षिका सुवर्णा सर्जेराव जाधव यांची करमाळा तालुक्यातून आदर्श शिक्षक या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुक्यात २ रा क्रमांक मिळवून देण्यामध्ये यशस्वी, उत्तम शालेय कामकाज व उत्कृष्ट अध्यापन या बाबीं ध्यानात घेऊन उमरड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अनिल यादव यांना सर्वसाधारण विभागातून पुरस्कार जाहीर केलेला आहे.
इयत्ता पाचवी मधील पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करण्यात मोलाचे मार्गदर्शन करणे, उत्कृष्ट अध्यापन बाबीं ध्यानात घेऊन वांगी क्रमांक १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका सुवर्णा सर्जेराव जाधव यांना शिष्यवृत्ती विभागातून पुरस्कार जाहीर केलेला आहे.
हा कार्यक्रम आज दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथील कार्यक्रमांमध्ये पुरस्कार दिला जाणार आहे या पुरस्काराचे प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील आमदार, खासदार जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या दोन्ही शिक्षकांचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.