करमाळा ‘भुमीअभिलेख’ कार्यालयात ॲन्टी करप्शनची कारवाई – लाच घेताना रेंगडे याला रंगेहाथ पकडले..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील भुमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक (वर्ग-३) खंडू मारूती रेंगडे याला अडीच हजार रूपयांची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
तक्रारदाराने त्याच्या मोरवड हद्दीतील जमिनीची मोजणी करून हद्दी निश्चित करणे व हद्दी निश्चित केल्यानंतर त्याची नकाशा प्रिंट काढण्यासाठी तातडीच्या मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक असलेली शासकीय तीन हजार रूपये फी चलनाद्वारे भरली होती. तरी देखील परिरक्षण भूमापक खंडू रेंगडे याने मोजणी करून हद्द कायम करणे व नकाशा प्रिंट काढण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती अडीच हजार रू. देण्याचे निश्चित झाले.
त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने २५ सप्टेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खंडू रेंगडे यास अडीच हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याबाबत करमाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, हवालदार गजानन किणगी, श्याम सुरवसे यांनी केली आहे.