आठवणी बालपणीच्या - म्हाळाचे जेवण - Saptahik Sandesh

आठवणी बालपणीच्या – म्हाळाचे जेवण

ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा होता, परतीचा मान्सून खूप मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे जिकडे तिकडे पाणी झाले होते. आता शेतकऱ्यांना पेरणीचे वेध लागले होते आज शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा होती. दुपारी सुट्टी असल्यामुळे आम्ही मित्रांनी बागवान विहिरीमध्ये पोहण्याचा बेत आखला होता,बहिण शेळ्या घेऊन शेतात गेली होती तर आई देखील पेरणी चालू असलेल्या शेतात न्याहरीच्या भाकरी घेऊन सकाळी जाणार होती. आज माझे शाळेत बाईंच्या शिकवण्याकडे काहीच लक्ष नव्हतं, कारण माझ्या डोक्यात शाळा सुटल्याबरोबर जेवण करायचं आणि गल्लीतील मित्राबरोबर बागवान विहिरीमध्ये खूप पोहायचं. मी पोहायला शिकून फक्त आठ ते दहा दिवस झाले होते, शहाजी पाटलांनी कमरेला कासरा (बैलांचा दोर)बांधून मला याच बागवान विहिरीत पोहायला शिकवले होते. पूर्वी पाण्याला मी खूप घाबरायचो परंतु आता पोहायला शिकल्यापासून रोज पोहायला जावे असे वाटत असे.

शाळेची घंटा झाली सर्व मुले हातात दप्तर घेऊन घराकडे जाऊ लागली, शनिवारी दुपारची सुट्टी असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या शेतामध्ये दुपारनंतर जात असे. मी देखील शेतात जात होतो परंतु आज मात्र शेतात जायचे नाही असे ठरवले होते. घरी गेलो पत्र्याची खोली उघडली खुंटीला पिशवी(दप्तर) अडकवली आणि शिक्यातील टोपल्या हात घातला, त्याच्यामध्ये काहीच नव्हते याचा अर्थ आईने माझे जेवण घरी ठेवले नव्हते. त्यामुळे मला नाईलाजाने शेतात जाण्याची वेळ आली . मी खोलीचा दरवाजा लावला आणि शेतात निघालो. शेताच्या वाटेवरतीच बागवान विहीर होती, परंतु भूक लागलेली असल्यामुळे माझे पाय शेताकडेच निघाले. उमाठावरती गेलो असता पुढून आई आणि बापू घराकडे येताना मला दिसले, पेरणीचे काम सोडून बापू आणि आई घराकडे येत आहेत याचं मला नवल वाटलं . आई किंवा बापू आजारी असतील ही देखील शंका आली. उमाट ओलांडून मी पुढे गेलो आणि आमची समोरासमोर भेट झाली. आई म्हणाली “तळवणीमध्ये (शेतात) आप्पा(भाऊ) आणि मंगा(मंगल/बहिण) आहेत तू तळवळीत जा व जेवण कर आणि मंगा बरोबर शेळ्या राख”. मी आईला विचारलं “तुम्ही कुठे चाललाय” ? त्यावर आई म्हणाली ” आम्ही म्हाळाचे जेवायला चाललो आहे. रावसाहेब अण्णा (रावसाहेब गवळी)यांच्यामध्ये आम्ही पितर आहोत तेव्हा जेवण करून येतो तू शेतात जा”.. म्हाळाचे जेवण’ म्हटल्यानंतर माझा पाय शेताकडे चालेना, मी त्यांच्याच मागे फिरलो आणि मागे-मागे निघालो वडील मला रागवत होते. तू मागे जा असे सांगत होते परंतु मी त्यांच्या मागे मागे चालत होतो. वडिलांनी मला पकडलं कान धरून वर-खाली केलं आणि दोन फटके लावले, तसा मी मोठमोठ्याने रडू लागलो आणि त्यांच्या पुढे घराच्या दिशेने पळू लागलो ते पाठीमागे होते मी पुढे चालत होतो.

ते दोघे येईपर्यंत मी गावच्या ओढ्यामध्ये थांबलो होतो. आई खडकावरच्या रस्त्याला आली व बापू सरळ रस्त्याने गावात गेले. बापू नसल्यामुळे मी आईला सांगितलं मी म्हाळाला जेवायला येतो,आईना होकारार्थी मान हलवली मला जवळ घेतलं आणि ओढ्यातील खडकावर कपडे काढून मला अंघोळ घातली, परत तीच कपडे घालून आम्ही घराकडे गेलो. घर उघडून आईने लुगडे बदलले माझ्या डोक्याला तेलाचा हात पुसला आणि आम्ही रावसाहेब अण्णांच्या घराकडे निघालो. अण्णांचे घर गावाच्या मध्यवर्ती चौकात होतं बापू सरळ रस्त्याने गेले, मात्र मी आणि आई खालच्या अळीतून मच्छिंद्र नायकाच्या घरा पुढून त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर वाड्यात प्रवेश करताच अण्णांनी आई आणि बापूंना पाटावर उभे केले व त्यांचे पाय धुवून हळदी कुंकू लावले, आई व बापू घरात गेल्यानंतर मी देखील पाटावर उभा राहिलो. अण्णांनी मिश्किल हास्य केलं आणि माझ्या पायावर पाणी ओतले, माझ्या पायाला हळदी कुंकू लावलं. ओसरीला घोंगडी टाकली होती त्याच्यावरती आम्ही बसलो, घरामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा वास दरवळत होता. थोड्यावेळाने जेवणाची ताटे आमच्यासमोर आली, ताटातले पदार्थ पाहून नकळत तोंडाला पाणी सुटले. वडिलांनी ताटातील पोळीचा थोडा तुकडा हातावर घेतला त्यावर भात, आमटी, भजी, कुरवडी थोडे-थोडे ठेवून तो घास बाजूला ठेवला, कारण तो घास गाई किंवा कावळ्यांसाठी ठेवायचा असतो. बापू हे त्यांचे पूर्वज पितर म्हणून जेवण करत असत, बापूंनी घास काढला तसाच मी काढण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु मला सर्वांनी सांगितलं तू असं करू नको.

पाटील सुरू करा असे अण्णा म्हणताच सर्वांनी जेवणाला सुरुवात झाली ताटातील पदार्थ अतिशय चविष्ट होते, बापू आणि अण्णा आमटीचे फुरके मारत होते तसाच मी प्रयत्न केला आणि मला ठसका लागला तेवढ्यात अण्णा म्हणाले वर बघ विमान आलंय मी वरती पाहिले आणि माझा ठसका बंद झाला पुरणपोळी,आमटी,भात,कढी,वड्या, तळलेली गवार आणि भेंडी , भजी-कुरवडी असे विविध पदार्थ खाऊन पोट भरले. जेवण झाल्यानंतर बापू आणि अण्णांनी पान खाल्ले मी पण मागितले असता त्यांनी मला नकार दिला आणि अण्णा म्हणाले शाळेतील मुलांनी पान खाऊ नये जीभ जड येते, थोड्या वेळानंतर आम्ही शेताकडे निघालो ओढा ओलांडून पुढे गेलो तर बागवान विहिरी वरती सर्व मित्रमंडळी पोहोत होती, मला शेताकडे जायची इच्छा नव्हती आता जेवण झाल्यामुळे इथंच थांबून पोहावे व परत घरी जावे असे वाटत होते. परंतु वडिलांनी पोहण्यास मनाई केली. मी वडिलांच्या हाताला एकदम जोरात झटका दिला आणि धूम ठोकून विहिरीवर गेलो, शर्ट काढला आणि विहिरीत उडी टाकली. पाठीमागून वडील आले. आई तशीच पुढे वाटेने चालत गेली वडिलांनी मला वर येण्याची धमकी दिली. परंतु मी वर येण्याऐवजी,बांधिव विहीर असल्यामुळे मी पायऱ्याच्या विरुद्ध टोकाला जाऊन, दगडाच्या फटीमध्ये हात घालून थांबलो होतो.. शेवटी वाट पाहून पाहून वडिलांनी शर्ट काढला आणि विहिरीत उडी मारली, मला पकडून पायऱ्या वरती आणले दोन-तीन कानपाडात दिल्या. वर आल्यानंतर शर्ट घेतला आणि शेताच्या दिशेने निघालो. बापूंनी एका हातात मला पकडले होते चालत चालत दुसऱ्या हाताने तरवडीचा (वनस्पती) फोक मोडला आणि माझ्या पायावर मारायला सुरुवात केली, दोन-चार फोक मारल्यानंतर मी कशीबशी बापूच्या तावडीतून सुटका केली आणि हातात शर्ट घेऊन शेताच्या वाटेने धूम ठोकली. शेतात गेल्यानंतर बहिण शेळ्या राखत होती तिच्याकडे गेलो व तिला हा सर्व हकीगत सांगितला पायावरचे वण दाखवले, त्याचबरोबर कोणकोणते पदार्थ खाल्ले याचे वर्णन सांगितले ते ऐकून बहिणीच्या तोंडाला पाणी सुटले. मला मिष्टान्न खायला मिळालेले असल्यामुळे मला अतिशय आनंद झाला होता या आनंदामुळे बापूंनी मारल्यामुळे पायावर आलेले वण कधी ओसरले याची जाणीव देखील झाली नाही. हा सर्व प्रकार ऐकून बहीण म्हणाली “लहान मुलांनी म्हाळाचे जेवण करायचे नसते भूत -बादा होण्याची शक्यता असते”

प्रा. धनंजय विठ्ठल पन्हाळकर, (मो. ९४२३३०३७६८
मु.पो. नेरले, ता.करमाळा/ देवगड जिल्हा सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!