करमाळ्यातील खारीमुरीचा अवलिया…!

0

कमलाभवानी देवीच्या नावाने महाराष्ट्रात ओळख असलेले करमाळा शहर…सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले या शहराचे नाव…आणि याच शहरात गल्लीबोळांत कष्ट आणि चवीची एक परंपरा आहे..!

याच करमाळा शहरात रेवडी, जोडे आणि चिवटेची भेळ  यांसारख्या चटकदार पदार्थांची आठवण आपसूकच होते. पण या सगळ्यांत खारीमुरी हा करमाळ्याचा खास  जीभेची चव वाढवणारा पदार्थ आहे. शहरात अनेक खारीमुरी विक्रेते असले तरी एक नाव मात्र आवर्जून घ्यावंच लागतं ते म्हणजे श्री. राजेंद्र विठ्ठल देशमाने (वय ७४), रा. करमाळा यांचं…

पूर्वी करमाळा शहरात मनोरंजनासाठी दोन प्रसिद्ध चित्रपटगृहे होती — सुतार गल्लीतील योगेश चित्रमंदिर आणि जीन मैदानासमोरील सागर चित्रमंदिर. याच चित्रपटगृहात राजेंद्र देशमाने हे तिकीट मॅनेजर म्हणून अनेक वर्षे काम करत होते. काळ बदलला आणि काळाच्या ओघात दोन्ही थिएटर बंद झाली… देशमाने यांचे काम गेले.. अखेर जगण्यासाठीचा संघर्ष थांबला नाही.

तिकीटखिडकी बंद झाली आणि देशमाने यांनी हातात हातगाडी घेतली…तुटपुंज्या भांडवलातून, स्वतःच्या मेहनतीवर त्यांनी खारीमुरीचा व्यवसाय सुरू केला. गेल्या तीन दशकांपासून त्यांची
हातगाडीवर मोठी परात, बाजूला छोटेसे मडक, त्यात पेटलेला विस्तव…खारीमुरी कायम गरम, कडक आणि खमंग ठेवण्यासाठीची ही खास युक्ती!

खारीमुरी, शिजवलेले हरभरे आणि मसाला खारीमुरी — ही तीन पदार्थांची साधी पण चविष्ट मेजवानी!

दररोज सकाळी दहा वाजता व्यवसाय सुरू होतो.
करमाळा शहरातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक बाजारपेठ फिरून
रात्री आठ वाजेपर्यंत हा अवलिया आपली हातगाडी ढकलत असतो.
राजेंद्र देशमाने यांचे व्यक्तिमत्त्वही त्यांच्या खारीमुरीसारखेच —
शांत, संयमी, मितभाषी आणि मन जिंकणारे.
म्हणूनच प्रत्येक गल्लीत व्यापारी, मित्रपरिवार आवर्जून हाक मारतो —“राजेंद्र काका, पाच-दहा रुपयांची खारीमुरी द्या!” दिवसभरात फार मोठा नफा नाही…पण पूर्वी सुरू केलेला व्यवसाय बंद पडू नये,
ही जिद्द त्यांना आजही रस्त्यावर उभी ठेवते.


साधं, सर्वसामान्य कुटुंब…पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी.
मुलीचे लग्न झालेले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुलाचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले. आज तोही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भवानी नाका येथे दुसऱ्या गाड्यावर खारीमुरीचा व्यवसाय करतोय.

आजच्या महागाईच्या काळात असे छोटे व्यवसाय डबघाईला आलेत…
कित्येक ठिकाणी ते बंदही पडलेत. पण ग्राहकांना चविष्ट, खमंग खारीमुरीचा स्वाद देण्यासाठी हा ७४ वर्षांचा अवलिया आजही त्याच जोमाने उभा आहे. आजारपण, कुटुंबाची जबाबदारी,
मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, कोरोनासारखे संकट…असंख्य आव्हाने पेलत, न डगमगता प्रपंचाचा गाडा जबाबदारीने ओढणारा हा माणूस ,खऱ्या अर्थाने करमाळ्याचा अभिमान आहे. अशा जिद्दी, कष्टाळू आणि स्वाभिमानी खारीमुरीच्या अवलियाला —
राजेंद्र विठ्ठल देशमाने यांना आमचा मानाचा मुजरा…!

✍️प्रवीणकुमार अवचर, मांगी (ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!