केममधील रक्तदान शिबिरात २५५ जणांनी केले रक्तदान

केम(संजय जाधव): केम (ता.करमाळा) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोहळा समिती आणि सोलापूर ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण २५५ शंभू भक्तांनी रक्तदान करून केम येथे नवा विक्रम प्रस्थापित केला.


शिबिराचे उद्घाटन श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते, संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या प्रसंगी सोहळा समितीचे शंभू भक्त समीर दादा तळेकर यांनी सांगितले, “रक्तदाना सारखे दुसरे कोणतेही दान नाही. आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचा प्राण वाचू शकतो. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो, याची जाणीव ठेवून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.”

शिबिरामध्ये प्रत्येक रक्तदात्यास पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यासोबतच नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ देखील घेतला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शंभू भक्तांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली.





