‘ब्रिटिशकालीन’ डिकसळ पुल जड वाहतुकीसाठी बंद…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कोंढारचिंचोली (ता.करमाळा) येथील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन डिकसळ पुलास १६७ वर्ष पूर्ण झाली असून, सदर पूल हा ४० वर्षाहून अधिक काळ सतत पाण्यात उभा आहे. त्यामुळे जड वाहतूकीसाठी धोकादायक बनल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ११ ऑक्टोबर रोजी लोखंडी बँरीकेटर्स लावून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना भिगवण बारामती येथे जाण्यासाठी हा प्रमुख पुल आहे, साखर कारखान्यांची उस वाहतूक याच पुलावरून होत असते, सध्या या पुलाचे वयोमान झाले असून सावित्री नदीवरील पुलाची दुर्घटना झाली तशी घटना टाळण्यासाठी व पूल चांगला राहावा या करिता या भागातील सामाजिक कार्यकर्ते व कोंढारचिंचोलीचे मा.सरपंच देविदास साळुंके हे गेली ५ ते ६ वर्षांपासून जड वाहतूक बंद करणेसाठी शासन दरबारीं प्रयत्न करीत आहेत, जड वाहतूक ही पर्यायी मार्गानी करून प्रशासनाला सहकार्य करावे, बँरीकेटर्स काढण्याचा कोणी प्रयत्न केल्यास रीतसर गुन्हा दाखल केला जाईल याची नोंद सर्वांनी घ्यावी असे देविदास साळुंके यांनी सांगितले आहे.