करमाळा येथे योग दिन उत्साहात साजरा

करमाळा (दि. 22): जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन करमाळा शहरात मोठ्या उत्साहात आणि जनसहभागाने पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता कन्या हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आली. शहर व परिसरातील शेकडो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग सत्रात भाग घेतला.

या प्रसंगी प्रशिक्षित योग मार्गदर्शक हनुमानसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली योगासन, प्राणायाम व ध्यानधारणेचे सुस्पष्ट आणि शास्त्रीय पद्धतीने प्रात्यक्षिक घेण्यात आले. उपस्थित नागरिकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत योगाचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे फायदे समजून घेतले

यावेळी बोलताना भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले, “योग ही फक्त व्यायामाची प्रक्रिया नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित करणारी कला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले. आपण देखील दररोजच्या जीवनशैलीत योगाचा समावेश करावा.” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात भीष्माचार्य चांदणे सर, चव्हाण सर यांनी योग विज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या शिबिराला जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, प्रमोद फंड, बाळासाहेब कुंभार, राजूकाका वाशिंबेकर (पतंजली योग समिती), प्रदीप वीर, पत्रकार दिनेश मडके, पूजा माने, नानासाहेब अनारसे, पप्पू शिंदे, गणेश माने, कमलेश दळवी, प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात स्थानिक स्वयंसेवक, सामाजिक संस्था, आरोग्य विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी गणेश चिवटे यांनी सर्व सहभागी आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.



