संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व अल्याड – पल्याड हे दोन चित्रपट करमाळा येथील सिनेमा गृहात आजपासून होणार प्रदर्शित - Saptahik Sandesh

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व अल्याड – पल्याड हे दोन चित्रपट करमाळा येथील सिनेमा गृहात आजपासून होणार प्रदर्शित

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील छोटू महाराज या सिनेमागृहात आज शुक्रवार दिनांक 14 जून रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व अल्याड – पल्याड हे दोन चित्रपट प्रसिद्ध प्रदर्शित होत आहेत. १४ जून ते २० जून दरम्यान हे चित्रपट चालू राहणार असून Book My Show या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरून लोक तिकीट खरेदी करू शकतात. या चित्रपटांविषयी थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील – सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हे नाव खूपच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनमुळे जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट देखील तयार करण्यात आला असून या चित्रपटातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाची रिलीज डेट २६ एप्रिल होती परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डने ही तारीख पुढे ढकलायला लावली होती. आज (दि.१४) हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाच्या लेखनाची आणि निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. तर, शिवाजी दोलताडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. डॉ. सुधीर निकम यांनी या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा लिहिली आहे. अभिनेता रोहन पाटील यांनी या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले आणि सिद्धेश्वर झाडबुके यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

अल्याड – पल्याड

एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड’ चित्रपट १४ जूनला प्रेक्षक भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. आपला महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती, तसेच प्रथा, परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. 

मोजक्याच तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेविषयी रसिकांना नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘अल्याड पल्याड’ (Alyad Palyad Movie) या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 

या चित्रपटात गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत. कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे.  वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी  यांचे आहे. लाईन प्रोड्यूसर दिपक कुदळे पाटील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!