केम परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा नागरिकांचा दावा – दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : काल (दि.१२) केममधील बेंद भागात भीमा सेना बोगद्याजवळ रात्री आठच्या सुमारास सोनू बळीराम तळेकर यांनी प्रत्यक्षात बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे, दोन दिवसांपूर्वी केम येथील शेतकरी हनुमंत तळेकर यांची शेळी अज्ञात प्राण्याने खाल्ली होती. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचा दावा या भागातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे केम परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
केम (ता. करमाळा) येथील सोनू तळेकर हे शेतीला पाणी देण्यासाठी बोगद्या जवळील विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस ऊस तोडून गेलेल्या शेतामध्ये त्यांना बिबट्या दिसला व ते तिथूनच माघारी परतले. यानंतर त्यांनी ही माहिती इतर शेतकऱ्यांना सांगितले. ए.पी. ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील यांनी त्वरित करमाळा वनविभागाचे अधिकारी लक्ष्मण आवारे यांच्याकडे संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. सदर वनविभागाचे पथक आज केम ला भेट देणार आहे व बिबट्याच्या ठशाची पाहणी करणार आहेत.
या अगोदर करमाळा तालुक्यात देवळाली, निंभोर व केम परिसरात शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात बिबट्या पाहिला त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता ऊन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे पिकाना पाणी दयावे लागत आहे. आता रात्रीची वीज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.