कमिशनर बालाजी मंजुळे यांना ‘करमाळा भूषण’ पुरस्कार जाहीर

करमाळा(दि.१८) : करमाळा येथील ग्रामसुधार समिती तर्फे देण्यात येत असलेला सन्मानाचा करमाळा भूषण पुरस्कार जेऊर येथील रहिवाशी व आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील राज्य ग्रामीण विकास संस्थेचे कमिशनर बालाजी पार्वती दिगंबर मंजुळे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे हस्ते येत्या २२ मार्चला होणार आहे. या समारंभात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सोलापूर येथील प्रधान कार्यालयातील प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र रणसिंग यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे; अशी माहिती ग्रामसुधार समितीचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे व सचिव डी.जी. पाखरे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, की संस्थेच्या करमाळा भूषण पुरस्कार समितीच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बालाजी पार्वती दिगंबर मंजुळे हे अत्यंत सर्वसामान्य परिवारातून कष्टाच्या जोरावर सन २००९ ला आय.ए.एस. झाले आहेत. आंध्रप्रदेश केडर मध्ये ते कार्यरत आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून राजेंद्र रणसिंग हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा विशेष सन्मान या समारंभात करण्यात येणार आहे. हा सन्मान विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. तसेच प्रा. शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्याच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान आमदार नारायण (आबा) पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष अॅड. डॉ. बाबुराव हिरडे हे राहणार आहेत. यावेळी बारामती अॅग्रोचे व्हा.चेअरमन सुभाष (आबा) गुळवे, माजी जि.प.सदस्य सवितादेवी राजेभोसले, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदित्य माळवे, सदस्य संदीप काळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम शनिवार, २२ मार्च ला सकाळी ठिक ११ वाजता खातगाव येथील रणसिंग फार्मवर (उजनी परिसरात) संपन्न होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे; असेही आवाहन श्री. शिंदे व श्री.पाखरे तसेच रणसिंग परिवाराने केले आहे.





