वॉटर फिल्टर, स्मार्ट टीव्ही, वृक्षारोपण यामुळे दहिगावची शाळा झाली अजून स्मार्ट
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा आहेत. सध्या संवेदनशील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मनापासून काम करणारे शिक्षक यांच्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगले दिवस येत असून अधिक चांगल्या दर्जाच्या बनत आहेत. अशाच प्रकारे दहिगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक यांच्यामुळे चांगले दिवस येत आहेत. दि.१५ सप्टेंबर रोजी करमाळा तालुक्यातील शेळकेवस्ती(दहिगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करमाळा येथील यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने या शाळेसाठी दोन स्मार्ट टीव्ही देण्यात आले आहेत. तसेच करमाळा पंचायत समितीच्या वतीने शाळेस पाणी फिल्टर बसविण्यात आले. याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, माजी उपसभापती गणेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, केंद्रप्रमुख वंदना पांडव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी राज्य कर सहाय्यक आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल कु ज्ञानेश्वरी आबासाहेब गोडसे यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत उपक्रमशील शिक्षक विजय राऊत यांनी केले. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना यशकल्याणी सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष गणेश करे पाटील म्हणाले,”जिल्हा परिषदेच्या शाळा केवळ ज्ञानदानाचे केंद्र न होता ती सुसंस्कारित विद्यार्थी घडवणारी मंदिरे व्हावीत”. यावेळी करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “लहान मुलांकडून पालकांनी अवास्तव अपेक्षा ठेवू नये. त्यांच्या बालमनावर कोणत्याही प्रकारचे दडपण आले नाही पाहिजे. स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांना वेळोवेळी बक्षिसरुपी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.”
या कार्यक्रमाला सरपंच प्रियांका गलांडे उपसरपंच आप्पासाहेब लोखंडे, पत्रकार गजेंद्र पोळ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बापूसाहेब कोंडलकर सोसायटी चेअरमन श्री हरिश्चंद्र शेळके भारत पांडव माजी सरपंच संजय गलांडे बापूराव लोखंडे नानासाहेब साळुंखे विजय लबडे महावीर निंबाळकर सचिन लोखंडे आबासाहेब गोडसे पल्लवी गलांडे उपस्थित होते. सूत्रसंचालन फोजमल पाखरे यांनी केले आभार श्री दस्तगीर शेख यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, काही पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.