जिद्द आणि हिंमतीच्या जोरावर दयानंद रोही यांची यशस्वी वाटचाल.. - Saptahik Sandesh

जिद्द आणि हिंमतीच्या जोरावर दयानंद रोही यांची यशस्वी वाटचाल..

“प्रत्येक व्यक्तीला मार्ग सरळसोपा मिळेल, असे नसते. मार्ग कसाही असलातरी जिद्द आणि हिंमत असेलतर व काम करायची इच्छा असेल तर प्रतिकुल परिस्थितीतही यश मिळवू शकतो. याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पोथरे येथील दयानंद शिवाजी रोही यांचे आहे.”

दयानंद रोही हे आई-वडीलांचे एकुलते एक पण वडीलांना व्यसन असल्याने घरात कायम आर्थिक चणचण. या अडचणीवर मात करणार कशी ? यामुळे त्यांना बारावीतूनच शिक्षण सोडून द्यावे लागले. वडील दिवसभर आपल्या व्यसनी मित्रांच्या संगतीत असल्याने ना शेतीचे उत्पन्न – ना अन्य कोणतेही साधन. त्यामुळे पुढील शिक्षणाचा खर्च तर मिळणे कठीण होतेच, पण घर चालवायचे कसे ? रोजीरोटीचा चालणार कशी ? हा त्यांच्या समोर प्रश्न होता. त्यामुळे बारावीनंतर त्यांना कै नाना झिंजाडे यांनी करमाळा येथील आसादेमामा यांच्या ग्लासच्या दुकानात कामावर नेले. त्या दुकानात काचाच्या कामाबरोबरच स्लाईडींग विंडो, ॲल्युमिनियमचे दरवाजे अन्य सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या.

नानासाहेब झिंजाडे सोबत काम करत या कामाचे शिक्षण घेतले. कालांतराने नानासाहेबांनी त्यांचा जय ग्लास म्हणून व्यवसाय सुरू केला तर दयानंद यांनी सन २०१५ मध्ये श्री स्वामी समर्थ ग्लास नावाने स्वतः चा व्यवसाय सुरू केला. खरतर हा व्यवसाय सुरू करताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे भांडवल नव्हते. परंतू मित्रांचे पाठबळ, विशेषतः सचिन प्रमोद झिंजाडे यांनी दिलेले सहकार्य महत्वाचे ठरले आणि त्यातूनच त्यांचा हा व्यवसाय सुरू झाला. या व्यवसायातून त्यांनी घरच्या व स्वत:च्या गरजा भागवून व्यवसाय वाढविला. सन २०१३ ला घर बांधले तर सन २०२२ मध्ये नुकतीच इर्टीगा अशी १४ लाखाची नवीन गाडी खरेदी केली आहे.


“माझ्या वडीलांचा मला त्रास नव्हता, परंतू मी लहान असतानापासून ते व्यसनात गुंतल्यामुळे त्यांच्याकडून सहकार्य मिळणे अपेक्षित नव्हते. घरात मी व दोन बहिणी. त्यामुळे शेती सुधारणे व माझी प्रगती करणे ही आव्हाने समोर होती. व्यवसायातून मिळालेले उत्पन्न शिल्लक ठेवू लागलो यातूनच माझे घर, माझे लग्न, माझा संसार आणि माझा व्यवसाय फुलला. मला हॉलीबॉल व क्रिकेटचा छंद असून त्यासाठी अवश्य वेळ देतो. यातूनच मला मित्र परिवार मिळाला आहे.”

माझ्या वाटचालीला माझे वडील शिवाजी, आई छाया, पत्नी शोभा यांची साथ मिळाली आहे. मला धिरज नावाचा मुलगा आहे. यापुढे व्यवसायाबरोबर मैदानी खेळ व सामाजिक कार्यात जास्तीत जास्त वेळ देण्याचे आपले स्वप्नं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!