जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत समाजसेवा करण्याचा माझा ध्यास - पै.डॉ.तानाजी जाधव - Saptahik Sandesh

जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत समाजसेवा करण्याचा माझा ध्यास – पै.डॉ.तानाजी जाधव

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत अखंड महाराष्ट्र राज्यासह देशभरामध्ये टायगर ग्रुपच्या वतीने समाजसेवा करण्याचा माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन म.राज्य टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ. तानाजी (भाऊ) जाधव यांनी केले.

वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात तानाजी जाधव बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून युवराज छत्रपती शहाजीराजे संभाजीराजे भोसले, आमदार संजयमामा शिंदे, पारनेरचे आमदार निलेश लंके, माजी आमदार जयवंतराव जगताप उपस्थित होते. तसेच दुबई येथून अमिनभाई व अनेक देशातून व्हिडीओ द्वारे शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.

यावेळी डॉ. तानाजी जाधव यांचेबाबत बोलताना शहाजीराजे भोसले म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर निवडक मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्याच पध्दतीने तानाजी भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श बाळगून समाजाच्या कल्याणासाठी टायगर ग्रुपची स्थापना करून महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशभर युवकांची मोठी फळी निर्माण केली आहे. जनकल्याणाचे काम करणाऱ्या डॉ.तानाजी जाधव यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे, असे मत छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.

करमाळ्यासारख्या एका ग्रामीण शहरामध्ये एका सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेऊन निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले तानाजी जाधव यांची टायगर ग्रुप संघटना राज्यात नव्हे तर देशपातळीवर तिचा नावलौकीक आहे. एक युवक निस्वार्थी भावनेने कुणाचेही पाठबळ नसताना शुन्यातून विश्व निर्माण करतो; याचा इतिहास नक्कीच साक्षीदार होत आहे. छत्रपतीच्या पावलावर पाऊल ठेवून तानाजी जाधव हे काम करत असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन कार्यरत आहे. त्यांच्या कार्यास आमचा सदैव पाठींबा आहे.

टायगर ग्रुपच्या वतीने तानाजी जाधव यांचा वाढदिवस एक आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमास महाराष्ट्रासह देशपातळीवर अनेक कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय लाखोंच्या संख्येने उपस्थित असतो. टायगर ग्रुपचे संस्थापक तानाजी जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास अनेक मान्यवरांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा देऊन आशिर्वाद दिले. चांडाळ चौकडीची वेबसिरीजच्या टीमने बाळासाहेब, रामभाऊ छोट्या या कलाकारांनी उपस्थित राहनू तानाजी भाऊंना आपल्या अनोख्या गावरान शैलीत शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिकराजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी तानाजी भाऊ जाधव मित्र मंडळ संयोजक करमाळा याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. करमाळा शहरता न भूतो न भविष्यती अशी नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. या सोहळ्यामध्ये राजकारणविरहित सर्व मित्र परिवार वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी महाराष्ट्र बरोबरच देशभरातून कार्यकर्त्यांचा मोठा समुदाय एकत्र आला होता. 

बेंगलोर, तमिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब,हैद्राबाद, कर्नाटक इ. राज्यातील टायगर ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अलोट गर्दीने तानाजी भाऊंनी अनेक युवकांच्या मनावर अधिराज्य केले असल्याचा प्रत्यय करमाळा तालुक्याला दिसून आला. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, मुळव्याध शिबीर घेण्यात आले. यामध्ये सर्व रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच मुठभर धान्य अभियान, गोरगरीबांना कपडे वाटप, विद्यार्थ्यांसाठी गणवेश वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच भव्य कबड्डी स्पर्धा घेण्यात आली तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रमही संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!