'नफरत छोडो, संविधान बचावो, भारत जोडो' यात्रेचे उद्या ५ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे आगमन होणार.. - Saptahik Sandesh

‘नफरत छोडो, संविधान बचावो, भारत जोडो’ यात्रेचे उद्या ५ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे आगमन होणार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.४) : भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ स्वराज इंडिया व विविध जनसंघटनांच्यावतीने कोल्हापूर पासून निघालेल्या ‘नफरत छोडो, संविधान बचावो, भारत जोडो’ यात्रेचे ५ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे आगमन होणार असल्याची माहिती सुनील सावंत व ॲड. सविता शिंदे यांनी दिली.  

या यात्रेची सुरुवात कोल्हापूर येथे स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव व खासदार सतेज पाटील यांच्या उपस्थिती झाली असून कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यात्रेचे स्वागत करतील. यात्रा देगलूर येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार आहे. 

याबाबत सुनील सावंत म्हणाले की, ‘नफरत छोडो, संविधान बचाओ, भारत जोडो’ यात्रेचे उद्या ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वा. करमाळा येथे आगमन होईल. करमाळा एस. टी. स्टँड येथे यात्रेचे स्वागत करून यात्रा मेन रोडने महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहचेल व त्याठिकाणी जाहीर सभा घेण्यात येईल. जाहीर सभेत बी. आर. पाटील मा. आमदार कर्नाटक, ललित बाबर उपाध्यक्ष स्वराज इंडिया महाराष्ट्र, सुभाष लोमटे उपाध्यक्ष हमाल मापाडी संघटना, महाराष्ट्र ई. नेते मार्गदर्शन करणार आहेत. 

याबाबत बोलताना ॲड. सविता शिंदे म्हणाल्या की, देशातील वाढती महागाई, लोकांची दिशाभूल करून धार्मिक भेदभाव धार्मिक जातीय तेढ निर्माण करणे, भ्रष्टाचार, ठराविक उद्योगपतींची वाढणारी अमाप संपत्ती, संविधान मोडीत काढण्याचे सत्ताधाऱ्याचे प्रयत्न यामुळे सामान्य माणसाचे जीवन कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्रितपणे अशा धर्मांध, सामान्यांचे शोषण करणाऱ्या सत्तापिपासू शक्तीशी लढणे आवश्यक आहे. त्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेद्वारे चांगली सुरुवात केली आहे. त्यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘नफरत छोडो, संविधान बचाओ, भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!