चिखलठाण ते कुगाव दरम्यान असणाऱ्या रस्त्याच्या कामासंदर्भात 'आमरण उपोषणाचा' इशारा.. - Saptahik Sandesh

चिखलठाण ते कुगाव दरम्यान असणाऱ्या रस्त्याच्या कामासंदर्भात ‘आमरण उपोषणाचा’ इशारा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चिखलठाण ते कुगाव दरम्यान रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत गेल्या वर्षभरापासून चालू आहे. परंतु हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जे काम झाले आहे ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या झालेल्या कामाची चौकशी करावी व उर्वरित राहिलेले काम त्वरीत चालू करावे; या मागणीसाठी चिखलठाण येथील प्रगतशील शेतकरी अविनाश मारूती सरडे, सचिन आनंदराव गावडे, शंकर रामचंद्र बोंद्रे व योगेश दत्तात्रय सरडे यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत त्यांनी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की चिखलठाण ते कुगाव रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून चालु आहे. झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असून गेल्या वर्षभरापासून हेकाम अपूर्ण असल्याने या भागातील नागरीकांना रस्त्येअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या कामाच्या पाठपुराव्यासाठी व काम चांगले व्हावे, यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, सोलापूर, अकलुज येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. तसेच लवकरात लवकर रस्त्याचे काम चांगल्या पध्दतीने करण्याची विनंती केली आहे. आठ दिवसात काम चालू करू; असे आश्वासन देऊनही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष काम सुरू करण्यास कोणतीही कारवाई केली नाही. लवकर या रस्त्याचे काम चालू झाले नाहीतर २२ ऑगस्ट पासून सकाळी साडेअकरा वाजता तहसील कार्यालय करमाळा येथे आमरण उपोषण करू; असाही इशारा सरडे, गावडे व बोंद्रे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!