केमचा कुंकू उद्योग औद्योगिक वसाहतीच्या प्रतीक्षेत - Saptahik Sandesh

केमचा कुंकू उद्योग औद्योगिक वसाहतीच्या प्रतीक्षेत

केम/संजय जाधव

कुंकू बनविण्यात करमाळा (जिल्हा सोलापूर) तालुक्यातील केमचे नाव प्रसिद्ध आहे. केमच्या कुंकवाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या महाराष्ट्राशेजारील राज्यांतही मागणी आहे. केमच्या कुंकू उद्योगाविषयी घेतलेला आढावा..

केममध्ये हळदीबरोबर चिंचोका, रताळ्याची पावडर, टोपिओका, डोलामॅट यांपासून कुंकू बनवले जाते. हळद सांगलीच्या बाजारातून तर डोलामॅट, स्टार्च, रताळ्याची पावडर हे पदार्थ कर्नाटकातून आणले जातात. केममध्ये कुंकू चिंचोक्यापासूनही मोठ्या प्रमाणात बनवले जाते. त्यासाठी बार्शीच्या मार्केटमधून चिंचोके खरेदी केले जातात. चिंचोक्यावरील काळे-तपकिरी टरफल काढले जाते. चिंचोके भाजावे लागतात. टरफल काढलेल्या चिंचोक्यांचा पांढरा गर कुंकू बनवण्यासाठी उपयोगी येतो. चिंचोके दळण्याची चक्की आहे. तेथे केममधील साऱ्या कुंकू उत्पादकांचे चिंचोके दळले जातात. दळलेल्या चिंचोक्यांच्या पावडरमध्ये सेल्फिक अ‍ॅसिड , नायट्रिक अ‍ॅसिड, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि ऑईल घालून ते मोठ्या मिक्सरमध्ये ढवळले जाते. एकजीव झालेले कुंकू ओले असते. ते धुळीपासून सांभाळत कडकडीत उन्हात सुकवले जाते.

कुंकवाचे वाळवण हा रमणीय सोहळा असतो. कामगार तीस-बत्तीस किलो वजनाची छोटी बोचकी पाठीवर घेऊन जेव्हा ओल्या कुंकवाचा सडा घालत असतात तेव्हा ते क्षण पाहण्यासारखे असतात. कुंकवाने रंगलेले कामगार लालेलाल कुंकवाचे वाळवण घालताना कुंकवापेक्षा वेगळे राहत नाहीत.

कुंकू उत्पादक विठ्ठल भिस्ते म्हणाले, की “साधारणपणे 1970 च्या आसपास हळदीपासून बनवलेल्या आमच्या कुंकवाची मागणी अचानक कमी झाली. त्याचा शोध घेतल्यावर कळले, की अमरावतीमध्ये तयार होणाऱ्या कुंकवाने सारे मार्केट काबीज केले आहे. तेथे बनणारे कुंकू स्वस्त होते. मग आम्हीही हळदीबरोबर अन्य प्रकारचे कुंकू बनवू लागलो.”

केमच्या कुंकवाच्या स्पर्धेत अमरावती, पंढरपूर, जेजुरी, अकलूज, इंदापूर, पुणे येथील कुंकू आहे.हळदीपासून दोनच प्रकारचे कुंकू तयार होऊ शकते. एक म्हणजे लाल कुंकू आणि दुसरा पिवळा भंडारा, पण अन्य माध्यमातून जवळ जवळ पंचवीस प्रकारचे कुंकू बनवले जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुलाल, वारकरी लावतात तो अबीर (बुक्का) व अष्टगंधही तयार होते. केममध्ये ऐंशी टक्के कुंकू चिंचोक्यापासून तर वीस टक्के कुंकू हळदीपासून बनवले जाते. कुंकू केममधून पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, भगवंताची बार्शी या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाते. त्याचप्रमाणे केमच्या कुंकवाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या महाराष्ट्राशेजारील राज्यांतही मागणी आहे.

कुंकू कारखान्यात काम करणारे कामगार हे अर्धकुशल गटात मोडतात. त्यांना रोजगार साधारणपणे शंभर ते एकशेपस्तीस रुपयांपर्यंत मिळतो. कुंकू बनवण्याचा कालखंड हा सप्टेंबर ते मे असा नऊ महिन्यांचा असतो. पावसाळ्याच्या कालावधीत कुंकू उद्योग थंडावतो. कारण पावसाळ्यात कुंकू वाळवता येत नाही. कामगार बहुतेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते पावसाळ्यात त्यांच्या शेतात काम करतात.

कुंकवाची वाहतूक ट्रकमधून होते. त्या गाड्यांत भराई करणाऱ्या कामगारांच्या टोळ्या आहेत. एक टोळी साधारणपणे दहा लोकांची असते. तशा आठ-नऊ टोळ्या केममध्ये आहेत. प्रत्येक कारखान्यात कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त वीस अशी कामगारांची संख्या आहे. ते सकाळी नऊ वाजता त्या कामगारांचे रोजचे काम सुरू होते, ते आदल्या दिवशी बनवलेले ओले कुंकू वाळत घालण्यापासून. त्यानंतर मग नवीन कुंकू बनवण्यास सुरुवात होते.केममध्ये कुंकवाचे कारखाने घरोघरी चालतात.

विठ्ठल भिस्ते म्हणाले, “आमचा गेल्या साठ वर्षांचा उद्योग आहे आणि तो घरात आहे, पण त्याचे कोणतेही वाईट परिणाम आमच्या कुटुंबीयांवर झालेले नाहीत. कारण हळद ही रोगप्रतिबंधक आहे.”

शामसुंदर सोलापुरे म्हणाले, “आम्हाला राज्य प्रदूषण महामंडळाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. आमच्या उद्योगापासून कोणतेही प्रदूषण होत नाही.”

शासनाने केमच्या कुंकू उद्योगाला लघुउद्योगाचा दर्जा दिला आहे, पण उद्योजक त्यासाठी मिळणाऱ्या सवलती घेऊ शकत नाहीत. कारण बहुतेक सारे उद्योग हे पाच-सहा पिढ्यांपासून चालू आहेत. लघुउद्योग सुरू करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करताना अनेक अडचणी निर्माण होतात. नवा उद्योग सुरू करण्याचे प्रस्ताव देताना जागा, कच्चा माल, यंत्र यांच्यासाठी आर्थिक मदत शासन देते. केममधील उद्योजकांसाठी तीच समस्या आहे. कारण त्यांच्याकडे यंत्रसामुग्री, जागा ही खूप आधीपासूनची आहे आणि फक्त कच्च्या मालासाठी शासनाची आर्थिक मदत मिळत नाही. शासनाने कुंकू निर्मितीच्या लघुउद्योगाबाबत पुन्हा वेगळ्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे.

केममधील कुंकू उत्पादकांची संघटना आहे. सर्व कुंकू उत्पादकांना त्यांचा उद्योग वाढवायचा आहे. त्यासाठी उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीचे स्वप्न त्या साऱ्यांनी उराशी जपले आहे. त्यांनी ‘उत्तरेश्वर औद्योगिक वसाहत’ नावाने एक संस्था स्थापन केली आहे. मनोज सोलापुरे हे त्या संस्थेचे अध्यक्ष तर सचिव मिलिंद नरखेडकर आहेत. त्यांचे प्रयत्न लहान स्वरूपाच्या एमआयडीसीला मान्यता मिळावी म्हणून चालू आहेत. उद्योजकांनी वीस एकर जागा खरेदी केली आहे, त्यांचा प्रस्ताव शासनदरबारी विचाराधीन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!