ओला दुष्काळ जाहीर करून फळबागास एक लाख रू.अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा – अंगद देवकते
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ओला दुष्काळ जाहीर करून खरीप व रब्बी पिकास एकरी पन्नास हजार व फळबागास एक लाख रू.अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा, तसेच पोथरे,खडकी सह पूर्व भागातील अनेक छोटे-मोठे पूल बंधारे रस्ते अतिवृष्टीच्या पाण्याने वाहून गेल्याने वाड्यावस्त्याचा गावात ये जा करण्याकरिता संपर्क तुटलेल्यामुळे स्त्यावर त्वरीत मुरूमीकरण करा या मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत पुढे त्यांनी म्हटले की, ढगफूटी सदृश्य परतीच्या पाऊसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते होऊन शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेली पिकं पूर्णपणे पाऊसाने वाया गेली आहेत. यामध्ये तूर, मका, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल लिंबू, केळी, पेरू, सह चालू खरीप-रब्बी पिके व फळबागामध्ये प्रचंड पाणी साचवून जमिनीचा जास्त ओलावा आसल्याने पिकं व फळबाग पिवळे पडून जळत आसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांनी शेती उत्पन्न वाढीसाठी उसणवारी व व्याजाने पैसे घेऊन पिकं, फळबागा टिकवण्यासाठी वाढत्या महागाईत खते,बी,औषधे,मशागतीला प्रचंड खर्च करून देखील उभी पिकं जळत आहेत. त्यातच कोरोना,चक्रिवादळ,लम्पीचे थैमान आणि आत्ताच्या अतिवृष्टीमुळे महापूरजन्य परिस्थितीमुळे बळीराजाचे कंबरडे मोडलेले आहे.शेतीला लाखो रुपये खर्च करून देखील स्वताःच्या डोळ्यादेखत उभी असलेली पिकं वाया गेल्यामुळे बळीराजा हतबल होऊन पुन्हा खाजगी ऊसनवारीसाठी हात पसरत कर्जाचा डोंगर वाढतच चालल्याने आत्महत्याचे संकट निर्माण होऊ शकते.
त्यामुळे रब्बी व खरीप पिकांस एकरी पन्नास हजार रूपये व फळबागेस एकरी एक लाख रुपये अनुदान पाच नोव्हेंबर च्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावे.आशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रंजीतसिंह नाईक निंबाळकर,आमदार संजय मामा शिंदे, जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी,पंचायत समिती गटविकास अधिकारी करमाळा यांना पाठवण्यात आलेल्या आहेत.याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा अध्यक्ष शंकर सुळ, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल भिसे, नेते बाळासाहेब टकले,नेते शहाजी धेंडे,रासप माजी संर्कप्रमुख दीपक कडू, लक्ष्मण झिंजाडे विकास मेरगळ, धनाजी लोखंडे महाराज, परशुराम लोखंडे, रावसाहेब बिनवडे, राहुल पाटील, रासप नेते जिवन होगले, सामाजिक कार्यकर्ते प्रविण होगले, दादासाहेब ननवरे इत्यादी उपस्थित होते. या निवेदनात देवकते म्हणाले की,सततच्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यातील बळीराजासह सर्व सामन्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ढगफूटीसदृश्य पाऊसामुळे पूर्व भागातील पोथरे, निलज, खडकी, आळजापूर, कामोणे, घारगाव, पाडळी, पूनवर, जाते गाव, बिटरगाव, घारगाव,पाडळी येथील गावाअंतर्गत वाड्यावस्त्याला जोडणारे छोटे-मोठे पूल बंधारे रस्त्यासह प्रचंड पाऊसात शेती पिकांसह वाहून गेल्याने वरील विविध गावातील नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी वाहत्या पाण्यातून व गुडघाभर चिखलातून दोन ते तीन किलोमीटर पायी रात्री-अपरात्री पायपीट करावी लागत आहे. तसेच लहान मुलांना शाळेत सोडणे, दूध वाहतूक करणे व आजारी व्यक्तीस गावात किंवा तालुक्याला जाण्यास पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने मुलाबाळांचे वयो-वृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे तात्काळ दुरूस्ती व मुरूमीकरण किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समितीला देण्यात यावेत. जेणेकरून नागरिकांना दळणवळणासाठी त्या रस्त्याचा दैनंदिन उपयोग होईल.मांगी तलावा ओव्हरफ्लो झाल्याने पोथरे येथील कान्होळा नदीला महापुर आल्याने पोथरे अंतर्गत गायरान वस्ती, माळवाडी, नाळे वस्ती निलज रोड, लाढाणे वस्ती मांगी रोड,निलज गावठाण ते शिंदे वस्ती निलज इत्यादी वाड्यावस्त्यांचा गेली पंधरा दिवसापासून गावचा संपर्क तुटलेला आहे.
या भागातील नागरिकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अद्याप अतिव्यवस्थापन समिती,संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाहाणी सुध्दा केलेली नाही.तातडीने पूर्व भागातील वाड्यावस्त्यावरील नागरिकांचा प्रश्न तात्काळ सोडण्यात यावा आन्यथा पंचायत समिती येथे कुटूंबासमवेत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची असेल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी दिला आहे.