स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील अपात्र शिक्षक नियुक्तींवर कारवाईची मागणी

केम(संजय जाधव): स्वयंअर्थसहाय्यित इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अपात्र व अप्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारती सोलापूरतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना देण्यात आले.

संघटनेने निवेदनात नमूद केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांची पटसंख्या झपाट्याने घटत असून अनेक शिक्षक सरप्लस होत आहेत. विद्यमान शिक्षकांना टीईटीची सक्ती असताना, स्वयंअर्थसहाय्यित शाळांकडून पालकांची दिशाभूल करून बारावी किंवा केवळ पदवीधर व्यक्तींना शिक्षक म्हणून नियुक्त केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या विरोधात संघटना लवकरच मोठे आंदोलन छेडणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

आरटीई कायदा 2009 नुसार सेल्फ फायनान्स शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती एनसीटीई मानदंडांप्रमाणे बी.एड., डी.एड. तसेच टीईटी पात्र उमेदवारांकडून करणे बंधनकारक आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास पात्र बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळेल, असेही शिक्षक भारतीने स्पष्ट केले.


