श्री कमलाभवानी मंदिर रस्त्यावर गतिरोधक उभारण्याची मागणी..

करमाळा (दि.२) – येथील कमलाभवानी रस्त्यावर बांधकाम विभागाने तात्काळ गतिरोधक उभारावेत; अशी मागणी नागरीकांनी केली आहे. याबाबत कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रमेश कवडे यांनी सांगितले की, करमाळा शहर ते कमलाभवानी मंदिर या मार्गावरील रस्ता उत्तम दर्जाचा झाला आहे. या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने वेगात जात आहेत. रस्त्यावर कोठेही गतिरोधक नाही. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. येत्या ३ ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होत आहे. यावेळी रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अपघात होवू शकतात. म्हणून तात्काळ या रस्त्यावर गतिरोधक बसविणे आवश्यक आहे.





