तालुका कृषी विभागामार्फत बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके सादर.. - Saptahik Sandesh

तालुका कृषी विभागामार्फत बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके सादर..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कुंभारगाव (ता.करमाळा) येथे काल (ता.२२) मंडळ कृषी अधिकारी, केतुर तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कुंभारगाव अँग्रो शेतकरी गट क्रमांक-1, कुंभारगाव अँग्रो शेतकरी गट क्रमांक-2 व कुंभारगाव ऍग्रो कुटुंब महिला शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके करून दाखवण्याचा कार्यक्रम व खरीप हंगामातील विविध पिकांचे तांत्रिक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

कुंभारगाव येथे मंडळ कृषी अधिकारी, केत्तूर कार्यालयामार्फत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम व घरगुती बियाणे उगवणशक्ती क्षमता तपासणी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मंडळ कृषी अधिकारी अधिकारी देविदास चौधरी, कृषी पर्यवेक्षक उमाकांत जाधव, कृषी सहायक हरिदास दळवी, फारुख बागवान व वरील तीनही गटातील सदस्य व इतर शेतकरी उपस्थित होते.


संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी विभागामार्फत खरीप हंगाम प्रारंभ होण्यापूर्वी कृषी विस्तारासाठी कृषी सहाय्यक सजा निहाय 28 सुत्री नियोजन आराखडे तयार करण्यात आले आहेत त्या नियोजन आराखड्यामध्ये बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम, घरगुती बियाणे व इतर बियाण्यासाठी उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक मोहीम, हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक मोहीम, खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रशिक्षण मोहीम, व जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत वापर करण्यासाठी मोहीम इत्यादी 28 सूत्री आराखडाप्रमाणे तालुका कृषी अधिकारी करमाळा यांचे मार्फत प्रत्येक गावात वरील मोहिमा चालू आहेत.

सदर कार्यक्रमांमध्ये कृषी पर्यवेक्षक उमाकांत जाधव यांनी बीज प्रक्रिया म्हणजे काय? बीज प्रक्रियेचे फायदे, जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया यामध्ये काय काळजी घ्यावी जसे की जिवाणू संवर्धक लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके बुरशीनाशके इत्यादी लावलेले असेल तर जिवाणू संवर्धके नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे, तसेच ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकासोबत रायझोबियम, ऑझोटोबॅक्टर, स्पुरद विरघळणारे जिवाणू या जिवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करता येते, बीजप्रक्रिया करण्याचा क्रम जसे की सर्वात आधी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी यानंतर रासायनिक किटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी यानंतर तीन ते चार तासांनी रायझोबियम/ ऑझोटोबॅक्टर यांची बीजप्रक्रिया करावी व सर्वात शेवटी स्पुरद विरघळणाऱ्या जिवाणूची बीजप्रक्रिया करावी इत्यादी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींना श्री जाधव यांनी समजावून सांगितले. श्री हरिदास दळवी व श्री महेंद्र देशमुख यांनी बीज प्रक्रिया व उगवण शक्ती प्रात्यक्षिक करण्यासाठी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले तीनही गटातील महिला व पुरुष सदस्य या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

कुंभारगाव अँग्रो कुटुंब महिला शेतकरी गटातील महिलांनी तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनीही बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरील तीनही गटातील सर्व सदस्य व कृषी सहायक हरिदास दळवी कृषी सहायक फारूक बागवान यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!