करमाळा न्यायालयासाठी पुढील 50 वर्षे विचारात घेवून इमारतीचा आरखडा करावा लागेल : जिल्हा न्यायाधीश आजमी
करमाळा (ता.22) : करमाळा न्यायालयासाठी पुढील 50 वर्षे विचारात घेऊन इमारतीचा आरखडा करावा लागेल, त्यासाठी न्यायालयाजवळ किमान एक एकर जमीन उपलब्ध करावी लागणार आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मत सोलापूर जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश एम.एस.आजमी यांनी व्यक्त केले.
करमाळा वकील संघाच्या कार्यालयात त्यांनी आज ( ता.22) भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी करमाळा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तरच्या न्यायाधीश एम. पी. एखे, तसेच दिवाणी न्यायाधीश एस.पी.कुलकर्णी उपस्थित होत्या. पुढे बोलताना न्यायाधीश आजमी म्हणाले, की करमाळा न्यायालयामध्ये इमारतीचा प्रश्न आहे.
भविष्यात येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय ,वरीष्ठ न्यायालय तसेच जे.एम.एफ.सी.चे आणखी दोन न्यायालयाची अवश्यकता आहे. त्यासाठी भविष्यातील 50 वर्षाचा विचार करून नवीन ईमारतीची गरज लागणार आहे. आहे या न्यायालयाच्या ईमारतीजवळ शासनाची उपलब्ध जागेपैकी एक एकर जमीन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता वकीलसंघाच्या मदतीची गरज आहे. येथील रिक्त जागेवर नवीन न्यायाधीश नेमणुकीसाठी प्रयत्न करत आहे. येथील अन्य समस्या माहित असून त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. असेही न्यायाधीश आजमी यांनी सांगितले.
करमाळा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रविंद्र बरडे यांनी प्रास्ताविक करुन करमाळा न्यायालय व वकीलांच्या समस्या मांडल्या. वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. सुनिल रोकडे व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस.पी. लुणावत यांनी न्यायाधीश एखे व न्यायाधीश कुलकर्णी यांचे स्वागत केले. वकील संघाचे सचिव विनोद चौधरी यांनी सुत्रसंचलन व आभार मानले. यावेळी वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.