करमाळा तालुक्यात ‘रविराज कॉर्न कंपनी’मुळे शेतकऱ्यांच्या ‘मका’ पिकाला चांगला दर मिळणार…!
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोपळज (ता.करमाळा) येथे नव्याने सुरू झालेली ‘रविराज कॉर्न’ ही कंपनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे, शेतकऱ्याच्या ‘मका’ या पिकाला रास्त भाव आणि तात्काळ विकलेल्या मालाचे रक्कम रोख स्वरूपात प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन होत असताना दुर्दैवाने आदिनाथ व मकाई कारखाना अडचणीत आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्यास घालवण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे बॅक वॉटर असलेले गावांमध्ये अनेक शेतकरी केळी या पिकाकडे वळल्याने कंदर (ता.करमाळा) परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळी उत्पादन निर्यात करणाऱ्या कंपन्या आल्या.
त्यामुळे केळी या पिकाला चांगले दिवस आले मात्र बॅकवॉटर वगळता उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी पाण्यावर येणारे पीक म्हणजे ज्वारी आणि मका हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कल मका उत्पादनाकडे वाढवला मात्र कमी अधिक होणारे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांना योग्य असा बाजार भाव मिळण्यास अनेक अडचणी येत होत्या या बाबीचा विचार होऊन तालुक्यातील राजेंद्र पवार यांनी रविराज हायटेक या मार्फत ऑटोमोबाईल्स या क्षेत्रामध्ये ज्यांनी जगभर नाव मिळवलं आहे.
रविराज यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत असा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मक्यावर आधारित उत्पादन बनवण्याचा कारखाना सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेऊन अगदी अल्प काळात कारखाना सुरू केल्याने शेतकऱ्यांना रास्त भाव आणि तात्काळ मका विक्री केलेली रक्कम मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबीचा नक्कीच तालुक्याच्या प्रगतीमध्ये त्याचबरोबर अर्थकारणामध्ये फायदाच होणार असल्याने शेतकरी या नवीन झालेल्या कारखान्यामुळे शेतकरी आनंदी झालेले आहेत, असेही मत अनेकांनी व्यक्त केले. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये मका उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढलेले आहे, त्यामुळे नक्कीच भविष्य काळामध्ये रविराज प्रायव्हेट लिमिटेड मुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय निर्माण झालेला आहे. त्यामुळे यावर्षी येणारे मकाचे पीक वेळेत विक्री होऊन त्याची तात्काळ रक्कम मिळणार असल्याचे रविराज कंपनीमार्फत सांगण्यात येत आहे.