सांभाळण्यासाठी दिलेले दागिने चोरट्यांनी केले लंपास
केम (संजय जाधव) – गावाला जाताना जाऊ यांनी सांभाळण्यासाठी दिलेले दागिने व स्वतः चे काही दागिने असे मिळून १ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना केम येथे घडली आहे. या संदर्भात केम येथील राजश्री उत्तरेश्वर कांबळे यांनी करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आमच्या शेजारी राहणाऱ्या जाऊ सावित्री कांबळे यांनी नेहमीप्रमाणे गावाला जाताना आमच्याकडे सांभाळण्यासाठी त्यांचा राणीहार ठेवला होता. ७ ऑक्टोबरला रात्री आम्ही जेवण करून झोपलो होतो. मध्यरात्री चोरट्यांनी घरापाठीमागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केला व लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले जाऊ यांचा राणीहारसह माझे स्वतःचे इतर दागिने, मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केले. पहाटे चार वाजता जाग आल्यानंतर दरवाजा उघडा असल्याचे दिसले. बेडरूम मधील कपाटही उघडे दिसले. त्यानंतर आम्हाला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
या मध्ये चोरट्यांनी सोन्याचे डोरले (एक तोळा) अंदाजे कि.५०,००० रुपये, १ सोन्याचा लक्ष्मी हार (दीड तोळा) अंदाजे किंमत ७५,००० रुपये, झुब्याची एक जोडी सोन्याची (अर्धा तोळे) अंदाजे किंमत २५,००० रुपये, एक सोन्याची पिळयाची अंगठी (अर्धा तोळे) २५,००० रुपये असे मिळून सुमारे १,७५,००० हजार रुपयांचे दागिणे लंपास केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टीळेकर हे करीत आहेत.
या अगोदरही केम येथे चोऱ्या झाल्या आहेत परंतु एकाही चोरीचा तपास लागला नसल्याने चोरटयाचे फावते आहे. पोलिसांनी या चोरीचा तपास लावावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.