कुंभेजच्या निवास कन्हेरे यांच्या चित्रांचे दुबई येथे प्रदर्शन.. - Saptahik Sandesh

कुंभेजच्या निवास कन्हेरे यांच्या चित्रांचे दुबई येथे प्रदर्शन..

करमाळा (दि.१८) : करमाळा तालुक्यातील कुंभेज गावचे सुपुत्र निवास कन्हेरे यांच्या चित्रांचे दुबई येथील आंतरराष्ट्रीय आर्टफेअर मध्ये चित्र प्रदर्शन होत आहे. देशातील मोजक्या चित्रकारांच्या कलाकृतीमधे आंतरराष्ट्रीय स्तरावर समावेश होत असल्याने निवास कन्हेरे यांचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे 17 ते 20 एप्रिल दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड आर्ट दुबई आर्ट फेअर मध्ये जगभरातील कलाकार आणि आर्ट गॅलरी सहभागी होत आहेत. या आर्ट फेअरमधे मुंबई मधील बियॉन्ड आर्ट गॅलरी सहभागी होत आहे, बियॉन्ड गॅलरी मालक विभुराज कपूर यांनी या प्रदर्शनासाठी भारतातील मोजक्या चित्रकारांची निवड केली आहे त्यामध्ये नावास कन्हेरे यांच्या अमूर्त चित्रांचा समावेश आहे.


करमाळा तालुक्यातील कुंभेज या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील निवास कन्हेरे यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यांनी चित्रकला विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून काही काळ चित्रकला शिक्षक म्हणून करमाळा येथे नोकरी केली परंतु नाविन्य व शिकण्याची आवड यामुळे त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून ललीत कला प्रकारात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. अमूर्त चित्र (अबस्ट्रक्ट पेंटिंग) या प्रकारामध्ये त्यांनी आजपर्यंत अप्रतिम कलाकृती तयार केल्या. त्यांना भारतात व परदेशातही मोठा प्रतिसाद मिळाला. यापूर्वी मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. आता देशाबाहेरील महत्वाच्या चित्र प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे त्यांच्या पाच कलाकृतीचा या प्रदर्शनात समावेश होणार आहे.

अमूर्त चित्रकलेतून ग्रामीण भागातील प्रज्ञा अभिव्यक्त होतेय. जहांगीर आर्ट गॅलरी येथे झालेल्या प्रदर्शनाचे उद्घाटनाचे निमंत्रणावरून उपस्थित राहून ही कला प्रत्यक्ष पाहता आली. प्रस्थापितांचा दबदबा झुगारत करमाळा तालुक्यातील या भूमीपुत्राने घेतलेली गगनभरारी आणि त्यांच्या अंतर्मनातून साकारलेल्या कलाकृतीने जगात भारताची मान अभिमानाने उंचावत आहे याचा आनंद वाटतो. – प्रा.गणेश करे-पाटील (अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्था पुणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!